कलाविश्वावर शोककळा, रुग्णालयात सुरू होते उपचार
मुंबई : प्रतिनिधी
ज्येष्ठ विनोदी अभिनेते असरानी यांचे आज निधन झाले. ते ८४ वर्षांचे होते. असरानी यांचे पूर्ण नाव गोवर्धन असरानी असून त्यांच्यावर मागच्या काही दिवसांपासून उपचार सुरू होते. उपचारादरम्यान आज दुपारी ४ च्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांनी ५० वर्षांहून अधिक काळ चित्रपटसृष्टीत काम काम केले. त्यांच्या निधनाने संपूर्ण कलाविश्वावर शोककळा पसरली.
तीन पिढ्यांना हसविणारा हा दिग्गज अभिनेता आज आपल्यातून निघून गेला. ७० च्या दशकात फिल्म इन्स्टिट्यूटमधून आलेले अभिनेते असरानी विनोदाचे उत्तम टायमिंग आणि अनोख्या शैलीमुळे लोकप्रिय ठरले. चित्रपट रसिकांचे ५० वर्षांहून अधिक काळ मनोरंजन करीत जवळपास ४०० चित्रपटांत भूमिका साकारल्या. त्यांनी अभिनयासोबतच त्यांनी दिग्दर्शनातही पाऊल टाकले आणि हिंदी, गुजराती, मराठी चित्रपटांत आपली छाप सोडली. त्यांच्या जाण्याने एक लखलखता तारा हरपला, अशा शब्दांत शोक व्यक्त करण्यात आला. फुफ्फुसांच्या आजारामुळे असरानी यांना आरोग्य निधी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यानंतर सायंकाळी सांताक्रूझमधील शास्त्रीनगर येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
असरानी यांचा जन्म १ जानेवारी १९४१ रोजी जयपूर येथे झाला. त्यांनी जयपूरमधील सेंट झेवियर्स स्कूलमध्ये शिक्षण घेतले आणि नंतर राजस्थान कॉलेजमधून पदवी प्राप्त केली. त्यानंतर त्यांनी रेडिओ आर्टिस्ट म्हणून काम केले. दरम्यान, १९६७ मध्ये हरे कांच की चुडियाँ या चित्रपटाद्वारे त्यांनी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. यानंतर त्यांनी कधीही मागे वळून पाहिले नाही. १९७३ मध्ये असरानी यांनी मंजू बन्सलशी लग्न केले. असरानी यांना एक मुलगा असून त्याचे नाव नवीन असरानी आहे. सध्या तो अहमदाबादमध्ये डेन्टिस्ट आहे. असरानी यांचे वडील कार्पेटचे दुकान चालवायचे. त्यांना तीन भाऊ आणि चार बहिणी होत्या.
शोलेमधील भूमिका
ठरली संस्मरणीय
असरानींच्या सर्वात संस्मरणीय भूमिकांपैकी शोले चित्रपटातील जेलरची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. या चित्रपटातील त्यांचा डायलॉग, हम अंग्रेजों के जमाने के जेलर हैं, खूप प्रसिद्ध झाले आणि दशकांनंतरही लोक अजूनही या डायलॉगसाठी असरानींना ओळखतात.