लातूर : प्रतिनिधी
लातूर शहर महानगरपालिका आणि इम्प्रेशन फिटनेस, कातपूर रोड यांच्या संयुक्त विद्यमाने आगामी सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ च्या पार्श्वभूमीवर ‘स्वीप’ कार्यक्रमांतर्गत ‘झुंबा फॉर डेमोक्रसी’ या विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हा क्रीडा संकुल येथे पार पडलेल्या या कार्यक्रमात लातूर शहरातील विद्यार्थी, महिला आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन मतदानाचा जागर केला.आरोग्यासोबतच लोकशाहीचा उत्सव निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढावी आणि नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी, या उद्देशाने हा अभिनव कार्यक्रम राबवण्यात आला. सकाळी ७ वाजता सुरू झालेल्या या झुंबा सत्रात प्रशिक्षक उज्ज्वला चव्हाण, शितल भोपळे आणि प्रिया जाधव यांनी उपस्थितांना झुंबाच्या तालावर ठेका धरायला लावला. व्यायामासोबतच लोकशाहीचे महत्त्व पटवून देणा-या या उपक्रमाने तरुणाईला विशेष आकर्षित केले. मान्यवरांची उपस्थिती या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी महानगरपालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. यावेळी ‘स्वीप’ प्रमुख श्वेता नागने यांनी उपस्थितांना मतदानाचे महत्त्व सांगून प्रत्येक नागरिकाने आपल्या मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन केले. याप्रसंगी ढमाले, भापकर, खोत, इंद्राळे, चव्हाण यांच्यासह महानगरपालिकेचे अन्य कर्मचारी आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
१५ जानेवारीच्या मतदानासाठी सज्ज व्हा!
या कार्यक्रमाच्या माध्यमातून येत्या १५ जानेवारी रोजी होणा-या मतदानासाठी सर्वांना प्रोत्साहित करण्यात आले. ‘लोकशाही बळकट करण्यासाठी मतदान करणे हे आपले कर्तव्य आहे’, असा संदेश यावेळी देण्यात आला. विद्यार्थ्यांचा उत्साह आणि नागरिकांच्या प्रचंड प्रतिसादामुळे हा कार्यक्रम अत्यंत यशस्वी झाला असून, संपूर्ण लातूर शहरात सध्या या उपक्रमाची चर्चा सुरू आहे.

