मुंबई : अतिवृष्टी आणि पुरामुळे शेतीचे मोठे नुकसान झाल्याने त्यांचा फुलांच्या शेतीलाही मोठा फटका बसला आहे. त्यामुळे दादर फूल मार्केटमध्ये फुलांची आवक घटून झेंडूच्या दराने ‘सीमोल्लंघन’ करत किलोमागे थेट ३०० रुपये असा विक्रमी दर गाठला आहे.
इतिहासात पहिल्यांदाच झेंडूची फुले किलोमागे ३०० रुपये झाली आहेत, अशी माहिती दादर येथील फूल व्यापारी गणेश मोकल यांनी दिली. सततच्या पावसामुळे सुका झेंडूची मुंबईत आवक कमी झाली आहे. ओला झेंडूसुद्धा १०० ते १५० रुपये किलोने विकला जात आहे, असे मोकल यांनी सांगितले.
पावसामुळे आवक कमी आणि भाव वाढले असले तरी साडेतीन मुहूर्तांपैकी एक विजयादशमीचा मुहूर्त असल्याने प्रत्येक मराठी माणसाच्या घरातील दाराला झेंडूच्या फुलांचे तोरण बांधले जाते. पूजेसाठीही फुले घेतली जातात. त्यामुळे खरेदीचा उत्साह टिकून आहे, असे फुलांचे व्यापारी आणि दादर फूल मार्केट असोसिएशनचे पदाधिकारी पांडुरंग आमले यांनी सांगितले. सजावटीच्या फुलांनाही मोठी मागणी असल्याचे त्यांनी सांगितले.
२५ ते ३० कोटींची उलाढाल
दादरच्या फूल बाजारात दोन-तीन दिवसांत रोजची उलाढाल जवळपास २५ ते ३० कोटी रुपयांवर पोहोचली आहे. राज्यभरातून गेल्या तीन-चार दिवसांपासून ३०० ट्रक आणि ४०० टेम्पो, लहान पिकअप व्हॅनमधून फुले दादर मार्केटमध्ये दाखल झाली आहेत. माँसाहेब मीनाताई ठाकरे मंडईसह परिसरातील दुकाने, २५०-३०० छोटे व्यावसायिक, व्यापारी आणि स्टेशनबाहेरील कवी केशवसुत पुलाखालील जुन्या बाजारातील २५-३० दुकाने दस-यानिमित्त गजबजली आहेत.
अतिवृष्टी, पुरामुळे शेतीचे अतोनात नुकसान
राज्यातील बहुतांश भागात अतिवृष्टी आणि पुरामुळे फूल शेतीचेही मोठे नुकसान झाले होते. सततच्या पावसामुळे फुलांच्या पुरवठ्यावरही परिणाम झाला आहे. वाहतूक खर्चात वाढ झाल्याने परिणामी फुलांचे दरही वाढले आहेत. वसई-विरार, पालघर, सातारा, सांगली, कोल्हापूर, नाशिक, पुणे, बेळगाव तसेच बंगळुरूहून मुंबईत फुले येतात. अबोली व मोगरा या फुलांचा मुंबई प्रवास अनेकदा विमानाने होतो.