लातूर : प्रतिनिधी
जिल्ह्यात जानेवारी ते मार्च व मार्च ते जूनदरम्यान पाणीटंचाई निवारणासाठी ३९ कोटी ४८ लाख ८३ हजार रुपयांचा कृती आराखडा लातूर जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडून तयार करण्यात आला आहे. या २ टप्प्यांमध्ये जिल्ह्यातील १ हजार ३६४ गावे आणि ३७४ वाड्यांसाठी २ हजार ३०२ उपाययोजना प्रस्तावित करण्यात आल्या असून आवश्यकतेनुसार त्याची अंमलबजावणी होणार आहे.
जिल्ह्यात या वर्षी पावसाळ्यात सरासरीपेक्षा कमी पर्जन्यमान झाल्याने पाटबंधारे प्रकल्पांमध्ये पाणी साठा अत्यल्प आहे त्यामुळे येत्या उन्हाळ्यापूर्वीच जानेवारीपासून तीव्र पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. अनेक ग्रामपंचायतींकडून पंचायत समितीकडे गावांतील खाजगी विहिरी आणि विंधन विहिरी अधिग्रहण करण्याबाबत मागणी केलेली असून पंचायत समिती स्तरावर त्याची पाहणी करून गावातील खाजगी विहिरी, विंधन विहिरी अधिग्रहणाचे प्रस्ताव संबंधित तहसील कार्यालयास सादर करण्यात आले आहेत. सदर प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर पाणीटंचाई असलेल्या गावात अधिग्रहणाद्वारे पाणीपुरवठा होण्यास मदत होणार आहे.
पंचायत समित्यांकडून ग्रामीण भागातील पाणीटंचाई निवारणार्थ जानेवारी ते मार्च व मार्च ते जून या २ टप्प्यांच्या कालावधीचे टंचाई कृती आराखडे तयार करून जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडे पाठवले होते. जिल्हा परिषदेने जानेवारी ते जून या कालावधीसाठी ३९ कोटी ४८ लाख ८३ हजार रुपयांचा पाणीटंचाई कृती आराखडा तयार केला आहे. त्यास प्रशासनाची मंजुरीही मिळाली आहे.