कोल्हापुरात आरोपी ताब्यात, प्रिंटरसह साहित्यही जप्त
कोल्हापूर : प्रतिनिधी
टीईटी परीक्षेतील पेपर देतो म्हणून काही जणांना आरोपींनी बोलावले आणि उमेदवारांकडून मूळ शैक्षणिक कागदपत्रे आणि पैशांची मागणी केली. या प्रकरणाचा सुगावा लागताच पोलिसांनी धाड टाकून आरोपींना ताब्यात घेतले आणि विद्यार्थ्यांची शैक्षणिक कागदपत्रे आणि प्रिंटर, मोबाईल, चारचाकी वाहन आणि इतर वस्तूंसह १६ लाखांचा मुद्देमाल जप्त केला.
कोल्हापूर ग्रामीण पोलिसांच्या एका मोठ्या कारवाईत शिक्षक पात्रता परीक्षा पेपर लीक करण्याच्या रॅकेटचा पर्दाफाश झाला. २३ नोव्हेंबर २०२५ रोजी झालेल्या या कारवाईत मोठ्या प्रमाणात आक्षेपार्ह साहित्य जप्त करण्यात आले असून अनेक जणांना अटक करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखा आणि मुरगुड पोलिस ठाणे यांच्या संयुक्त कारवाईने हे यश मिळवले आहे. महाराष्ट्र सरकारद्वारे आयोजित केली जाणारी ही परीक्षा २३ नोव्हेंबर २०२५ रोजी होणार होती. या परीक्षेच्या आधीच पेपर लीक करण्याचा प्रयत्न करणा-या एका टोळीला पोलिसांनी पकडले.
राधानागरी तालुक्यातील दत्तात्रय चव्हाण आणि गुरुनाथ चौगुले यांनी या उमेदवारांशी संपर्क साधला. परीक्षेच्या आदल्या रात्री परीक्षेच्या प्रश्नपत्रिकांच्या झेरॉक्स प्रती देण्याचे आमिष दाखवून मूळ शैक्षणिक कागदपत्रे आणि पैशांची मागणी केली. या व्यवहारासाठी विद्यार्थ्यांना सोनगे, तालुका कागल येथील एका ठिकाणी बोलावण्यात आले होते. या प्रकरणाची माहिती मिळताच कारवाईचे आदेश दिले. त्यावरून सोनगे, तालुका कागल येथील शिवकृपा फर्निचर मॉलवर पहाटे धाड टाकून कारवाई केली.

