नवी दिल्ली : वृत्तसंस्था
अंडर १९ वूमन्स आशिया कप २०२४ स्पर्धेत भारतीय क्रिकेट संघाने विजयी सलामी दिली आहे. टीम इंडियाने निकी प्रसाद हिच्या नेतृत्वात कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा धुव्वा उडविला. भारताने हा सामना ९ विकेट्सने जिंकला. टीम इंडियाला विजयासाठी मिळालेले ६८ धावांचे माफक आव्हान हे ७.५ ओव्हरमध्ये पूर्ण केले.
टीम इंडियाची निराशाजनक सुरुवात झाली. दुस-याच बॉलवर पहिली विकेट गमावली; जी त्रिशा शून्यावर बाद झाली. मात्र त्यानंतर कामिलीनी आणि सानिका चाळके या जोडीने ६७ धावांची नाबाद भागीदारी करत टीम इंडियाला विजय मिळवून दिला. टीम इंडियासाठी जी कामिलीनी हीने सर्वाधिक धावा केल्या. कामिलीने २९ चेंडूमध्ये ४ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने नाबाद ४४ धावा केल्या. तर सानिका चाळके हीने ३ चौकारांच्या मदतीने १७ चेंडूत नाबाद १९ धावा केल्या.