मुंबई : मुंबईतील प्रसिध्द टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स (टीस) च्या १०० कर्मचा-यांना तडकाफडकी नोकरीवरून कमी करण्यात आले आहे. यामध्ये शिक्षक, शिक्षकेतर कर्मचा-यांचा समावेश आहे. २९ जून रोजी १०० कर्मचा-यांना त्यांच्या नोकरीचा करार पुढे वाढवला जाणार नाही, असे सांगण्यात आले. टाटा एज्युकेशन ट्रस्टकडून नियमित निधी न मिळाल्याचे कारण देत या कर्मचा-यांना नोकरीवरून कमी करण्यात आले आहे, यामुळे या कर्मचा-यांवर उपासमारीची वेळ आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, टाटा एज्युकेशन ट्रस्टकडून अगोदर नियमित मिळणारा निधी आता मिळत नसल्याचे कारण सांगत, या १०० कर्मचा-यांना नोकरीवरून काढून टाकण्यात आले आहे.
व्यवस्थापनाने कमी केलेल्या कर्मचा-यांना मेल पाठवून ही माहिती दिली. तसेच त्यांना नोकरीवरून काढून टाकणारी पत्रेही देण्यात आली आहेत. दरम्यान, नोकरीवरून काढून टाकण्यात आलेल्यापैकी अनेक कर्मचारी हे २००८ पासून टीसमध्ये कार्यरत आहेत. त्यांनी विविध अभ्यासक्रम, संशोधन प्रकल्पसुद्धा राबवले आहेत. त्यांचे प्रकल्प अजूनही सुरू आहेत, अशातच त्यांना कामावरून कमी करण्यात आले आहे. या कर्मचा-यांमध्ये ६० शिक्षक आणि ४० शिक्षकेतर कर्मचारी आहेत.