छ. संभाजीनगर : प्रतिनिधी
एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार आणि राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत सध्या वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आले आहेत. सामंत हे शुक्रवारी नागपूर, अमरावती दौ-यावर होते. यावेळी त्यांनी स्थानिक नेत्यांशी भेटीगाठी केल्या. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांशी संवाद साधला. हा दौरा आटोपून सामंत परतीच्या प्रवासाला निघाले. पण येथे त्यांना मन:स्तापाला सामोरे जावे लागले.
नागपूर, अमरावती दौरा आटोपून उद्योगमंत्र्यांना छत्रपती संभाजीनगरला जायचे होते. यासाठी ते अमरावती येथील बेलोरा विमानतळावर पोहोचले. आपल्याला संभाजीनगरला जायचे असल्याचे त्यांनी वैमानिकाला सांगितले. पण वैमानिकाने टेक ऑफ करण्यास नकार दिला. यामुळे पुढे उदय सामंत यांची चांगलीच धावपळ झाली.
वैमानिकाने टेक ऑफला का नकार दिला? याचे स्पष्ट कारण समोर आले नाही. पण कारण नसताना नकार दिल्याने उद्योगमंत्र्यांना अखेर समृद्धी महामार्गाने मोटारीने संभाजीनगर गाठावे लागले.
पायलटविरोधात तक्रार
उदय सामंत यांनी याप्रकरणी लोणी पोलिसांकडे तक्रार नोंदविली आहे. उद्योगमंत्री विमानात बसण्यासाठी जात असताना वैमानिक गगन अरोरा यांनी पूर्वसूचना न देता त्यांचे साहित्य विमानातून बाहेर काढल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
अखेर मोटारीने प्रवास
आपल्याला छत्रपती संभाजीनगरला पोहोचणे आवश्यक असून टेक ऑफ करा, अशी विनंती मंत्री सामंत यांनी वैमानिकाला केली परंतु काही नियम सांगत वैमानिकाने स्पष्ट नकार दिला. त्यामुळे वैमानिक गगन अरोरा यांच्या विरोधात पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे शेवटी मोटारीने उद्योगमंत्री छत्रपती संभाजीनगरला रवाना झाले.