लातूर : प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ६४ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्यस्पर्धेची प्राथमिक फेरी लातूरच्या मार्केट यार्डातील स्व. दगडोजीराव देशमुख स्मृती सभागृहात आहे. दि. २६ नोव्हेंबर रोजी कलारंग लातूरद्वारा प्रस्तूत संदीप इंदुलकर लिखीत व संजय प्रभाकर अयाचित दिग्दर्शित ‘टेडी बियर’ या दोनअंकी नाटकाचा प्रयोग झाला. या नाटकाने समाज व्यवस्थेवर ताशेरे ओढत निपुत्रीकांमध्ये नवा आशावाद जागवण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे.
आजच्या वेगवान जगामध्ये प्रत्येकजण फक्त स्वत:साठी आणि स्वत:साठीच जगतो आहे. व्यक्तिकेंद्रीत समाज निर्माण होऊन कुटूंब व्यवस्थेला धक्के बसत आहेत. घरातील दोघेही करिअर आणि पैशाच्या मागे धावत आहेत. त्यातूनच डबल इन्कम, नो किड्स, अशी संकल्पना समोर येत आहे. वाएत जाणारे वय, वयानूसार उत्पन्न होणा-या शारिरीक अडचणी यातून अपत्यप्राप्तीसाठी करावा लागणारा संघर्ष या परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी अनाथाश्रमातील मूल दत्तक घेणे हा त्यावरील एक चांगला उपाय होऊ शकतो.
अमर्याद व्यक्ती स्वातंत्र्य व स्वैराचार यातून कुटूंबव्यवस्था, परिवार पोखरुन निघत असताना लेखकाने एक आशेचा किरण या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. ज्यामुळे आपली कुटूंब व्यवस्था ही समतोल, शाश्वत राहील, असा विश्वास यातून दिसून येतो. या माध्यमातून समाजात अनाथ असणा-या मुलांना एक नवीन आकाश प्राप्त होईल व ज्यांना आपत्य होण्याची संभावना नाही, अशांसाठी अनाथाश्रमातील मुले दत्तक घेऊन आनंद द्विगुणीत करता येईल, असा आशावाद लेखकाने या लेखनातून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. सुवर्णा महाजन (मानसी), सुमती बिडवे-सूर्यवंशी (वैजयंती), ईश्वरी वाघमारे(कुमारी राजू), सुधन्वा पत्की(विशाल), सुमती बिडवे-सूर्यवंशी(टेडी) या सर्वांच्याच भूमिका छान झाल्या. सुधन्वा पत्की यांचा सहज अभिनय नाटकाचे बलस्थान ठरले. मानसी झालेल्या सुवर्णा महाजन ब-या होत्या तर सुमती बिडवे-सूर्यवंशी यांनी भुमिकेचा अभ्यास करुन मंचावर वावरताना दिसल्या.
वाय. डी. कुलकर्णी, अविष्कार गोजमगुंडे यांचे नैपथ्य कल्पक आणि सूचक व कथानकाशी साधर्म्य राखणारे होते. कल्याण वाघमारे, संजय श्री अयाचित यांच्या प्रकाश योजनेत कुठलाही भडक आणि उथळपणा नव्हता. प्रकाश योजना अर्थपूर्ण प्रवाही होती. किशोर जोशी यांचे पार्श्वसंगीत हळूवारपणे काळजाच्या तारा छेडीत होते. स्मिता संजय अयाचित, भारत थोरात यांची रंगभूषा, प्रिया कुलकर्णी, योगिता सुधन्वा पत्की यांची वेशभूषा चांगली होती.

