वॉशिंग्टन : वृत्तसंस्था
एलन मस्क आणि वाद हे समीकरण आता पक्के झाले आहे. मस्क यांची अब्जाधीश बनण्याची आणि कंपन्या ताब्यात घेण्याची कारकीर्द चर्चेत असते. परंतू आता अमेरिकेत मस्क विरोधी वादळ तयार झाले आहे. ट्रम्प सरकारमध्ये आततायी निर्णय घेतल्याने, डॉजचे प्रमुख असलेल्या मस्क यांच्या टेस्ला कंपनीला याचे परिणाम भोगावे लागणार आहेत. काही दिवसांपासून टेस्लाच्या कारना लक्ष्य केले जात होते. आता जनक्षोभ एवढा उसळला आहे की, ६७ टक्के अमेरिकन लोकांनी आपण टेस्लाची कार घेणार नाही, असे सांगितले आहे.
हा मस्क यांच्या कंपनीला आणि स्वत: मस्क यांना धोका असल्याचे मानले जात आहे. नुकत्याच घेतल्या गेलेल्या सर्व्हेमध्ये जवळपास दोन तृतीयांश अमेरिकन टेस्लाची कार घेण्यास नकार देत आहेत. लाखो सरकारी कर्मचा-यांना कामावरून कमी करणे, टेरिफ वॉर सुरु करणे आणि इतर देशांना देत असेलेला निधी बंद करणे या विषयांवरून अमेरिकेत आता लोकांमध्ये असंतोष उफाळू लागला आहे. टेरिफ वॉरमुळे अमेरिकेत कधी नव्हे तेवढी महागाई भडकली आहे. लोकांना दैनंदिन वस्तूंवर दुप्पट-तिप्पट खर्च करावा लागत आहे. कारण या वस्तू जे देश पुरवितात त्यांच्यावर अमेरिकेने टेरिफ लावले आहे. यामुळे या देशांतून येणा-या वस्तूंच्या किंमती वाढल्या आहेत.
याहू न्यूजने हा सर्व्हे केलेला आहे. भारतात येण्याची तयारी करत असताना मस्क यांच्या टेस्लाला अमेरिकेतच संघर्ष करावा लागणार आहे. यामुळे भारतात प्रकल्प उभारून हात-पाय रोवणे फोर्डसारखेच टेस्लाला देखील कठीण जाणार आहे. यामुळे जर अमेरिकेत फटका बसला तर जनरल मोटर्स, फोर्डसारखीच ही कंपनी देखील भविष्यात पलायन करण्याची शक्यता आहे.
याहू न्यूजने केलेल्या सर्वेक्षणानुसार, दोन तृतीयांश अमेरिकन (६७%) आता म्हणतात की, त्यांना टेस्ला कार खरेदी करायच्या नाहीत किंवा भाड्याने घ्यायच्या नाहीत. अहवालात असेही म्हटले आहे की त्यापैकी ५६% लोक कंपनीचे प्रमुख मस्क यांना त्यांच्या निर्णयामागील कारण मानतात. त्यापैकी ३०% लोक ते प्राथमिक कारण मानतात आणि २६% लोक ते एक योगदान देणारा घटक मानतात.