30.2 C
Latur
Saturday, July 6, 2024
Homeराष्ट्रीयटॉप-३ इकॉनॉमी हेच लक्ष्य

टॉप-३ इकॉनॉमी हेच लक्ष्य

पंतप्रधान मोदींनी जाहीर केला ५ वर्षांचा रोडमॅप
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
सध्या आपला देश जगातील पाचवी मोठी अर्थव्यवस्था असून लवकरच तिस-या क्रमांकावर पोहोचणे अपेक्षित आहे. सध्याच्या काळात अमेरिका जागतिक महासत्ता आहे त्यांनतर चीन, जर्मनी आणि जपानचा नंबर लागतो. देशाची अर्थव्यस्था जगात गतिमान असताना बुधवारी राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभारप्रदर्शनादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय अर्थव्यवस्थेबद्दल माहिती देत पुढील ५ वर्षाचा रोडमॅप सांगितला. आगामी काळात नवीन स्टार्टअप्स आणि कंपन्यांचा जागतिक उदय होईल, असे सांगतानाच भारताला विकसित राष्ट्र बनवण्याचा आमचा संकल्प असून टॉप-३ इकॉनॉमी बनण्याचे टार्गेट आहे, असे मोदी म्हणाले.

राज्यसभेत बोलताना पंतप्रधान म्हणाले की, पुढील पाच वर्षे गरिबीविरुद्धच्या लढाईत निर्णायक ठरतील. जगातील सर्वोच्च अर्थव्यवस्थांच्या यादीत भारतीय इकॉनॉमीला दहाव्या क्रमांकावरून पाचव्या क्रमांकावर नेण्यात आम्ही यशस्वी झालो. पण शीर्षस्थानी पोहोचल्यानंतर आव्हाने वाढतात. मात्र कोरोना आणि सर्व जागतिक तणावाच्या स्थितीतही आम्ही या टप्प्यावर पोहोचण्यात यशस्वी झालो आहोत. यानंतर देशाच्या जनतेने अर्थव्यवस्थेला पाचव्या क्रमांकावरून तिस-या क्रमांकावर नेण्याचा जनादेश दिला. आम्हाला मिळालेल्या जनादेशामुळे आम्ही जगातील टॉप-३ अर्थव्यवस्थांमध्ये भारताचा समावेश करू, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला.
गेल्या दहा वर्षातील कामाचा वेग आणखी वाढवू आणि संकल्प पूर्ण करू. जेव्हा देश जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल, तेव्हा त्याचा परिणाम जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रावर होईल. भारतातील प्रत्येक स्तरावर सकारात्मक प्रभावासोबतच जागतिक वातावरणातही अभूतपूर्व प्रभाव दिसून येईल तर आगामी काळात टियर-२ आणि टियर-३ शहरेही वाढीच्या इंजिनची भूमिका बजावतील, असे मोदी म्हणाले.

नवीन स्टार्टअप, नव्या कंपन्यांचा विस्तार होईल
आगामी कार्यकाळात नवीन स्टार्टअप आणि नवीन कंपन्यांचा विस्तार होईल. याशिवाय सार्वजनिक वाहतुकीत झपाट्याने बदल होणार असून भारतातील अधिकाधिक लोकांना लाभ मिळावा, यासाठी आम्ही गांभीर्याने वाटचाल करत आहोत, असेही पंतप्रधान म्हणाले.

विरोधकांचा सभात्याग
राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावरील चर्चेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर दिले. यावेळी मोदींनी कॉंग्रेसवर निशाणा साधला. तेव्हा विरोधकांनी वेलमध्ये उतरत घोषणाबाजी केली. या सर्व प्रकारावर संतापून राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांनी विरोधकांना समज दिली. त्यानंतर आक्रमक विरोधकांनी सभात्याग केला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR