टोकिओ : वृत्तसंस्था
सध्या जपानमधील वृद्धांची वाढती संख्या आणि ग्रामीण भागातील महिलांची घटती संख्या, हा सरकारसाठी चिंतेचा विषय बनला आहे. याचा सामना करण्यासाठी जपान सरकारने अविवाहित महिलांना लग्न केल्यास, एक मोठी रक्कम देण्याची योजना आखली आहे. मात्र, यासाठी महिलांना टोकियो सोडून ग्रामीण भागात लग्न करावे लागणार आहे.
जपानमधील ग्रामीण भागात अविवाहित महिलांची संख्या अविवाहित पुरुषांच्या तुलनेत बरीच कमी आहे. २०२० च्या राष्ट्रीय जनगणनेनुसार, टोकियो वगळता जपानच्या ४७ प्रांतांपैकी ४६ प्रांतात १५ ते ४९ वयोगटातील सुमारे ९१ लाख महिला होत्या. हा आकडा याच वयोगटातील १.११ कोटी अविवाहित पुरुषांच्या तुलनेत सुमारे २० टक्के कमी आहे. काही भागात हा फरक ३० टक्क्यांवर पोहोचला आहे.
गेल्या काही वर्षांत, पुरुषांच्या तुलनेत अधिक महिला ग्रेटर टोकियोमध्ये गेल्या आहेत. या महिला शिक्षणासाठी गेल्यानंतर पुन्हा ग्रामीण भागात परतत नाहीत. यामुळे जपानच्या ग्रामीण भागात लिंग गुणोत्तर ढासळत चालले आहे. जपान टाईम्सच्या वृत्तानुसार, नव्या उपक्रमांतर्गत आता सध्याचे अनुदान वाढवण्यात आले आहे. या अंतर्गत ग्रामीण भागांत जाणा-या महिलांना सरकार ७,००० डॉलरपर्यंत रक्कम देणार आहे.