पुणे : प्रतिनिधी
मुंबई-पुण्यातील नागरिकांना शेकडो कोटींचा गंडा घालणा-या टोरेस कंपनी घोटाळा प्रकरणात मुंबई पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. टोरेसची मूळ कंपनी असणा-या प्लॅटिनम हर्न प्रायव्हेट लिमिटेडचा सीईओ अर्थात मुख्य कार्यकारी अधिकारी असणा-या मोहम्मद तौसिफ रियाझला पोलिसांनी पुण्याजवळून अटक केली आहे.
दरम्यान, शेकडो नागरिकांची फसवणूक करणा-या या घोटाळ्यातील अनेक बाबी उघड होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विशेष म्हणजे, मोहम्मद तौसिफ रियाज हाच या प्रकरणातील व्हिसलब्लोअर अर्थात प्रकरणाला वाचा फोडणारा व्यक्ती असल्याचा दावा सुरुवातीला करण्यात आला होता.
मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकानं ही अटकेची कारवाई केली आहे. मोहम्मद तौसिफ रियाझ उर्फ जॉन कार्टर हा या प्रकरणाला वाचा फोडणारा अर्थात व्हिसलब्लोअर असल्याचा दावा सुरुवातीला करण्यात आला होता. शनिवारी रात्री रियाजला पुण्याजवळून अटक करण्यात आल्याच्या वृत्ताला आर्थिक गुन्हे शाखेनं दुजोरा दिला. त्यानंतर त्याची ३ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.