नवी दिल्ली : वृत्तसंस्था
जर टिम कुक यांनी अॅपल कंपनीचा उत्पादन प्रकल्प भारतातून अमेरिकेत स्थलांतरीत करण्याचा निर्णय घेतला तर याचा भारतापेक्षा जास्त आर्थिक फटका अॅपलला बसेल, असे ग्लोबल ट्रेड रिसर्च इनिशिएटिव्हचे संस्थापक अजय श्रीवास्तव यांच्या अहवालात म्हटले आहे.
या अहवालात असे म्हटले आहे की, जर आयफोनचा उत्पादन प्रकल्प भारतातून अमेरिकेत स्थलांतरीत केल्यास, भारतातील काही कमी पगाराच्या नोक-या कमी होतील, पण यामुळे भारत नवीन युगातील तंत्रज्ञानावर लक्ष केंद्रित करू शकेल आणि स्मार्ट फोनच्या उथळ असेंब्ली लाईन्सपासून दूर जाऊ शकेल.
भारत आणि चीन या दोन्ही देशांना उत्पादक म्हणून प्रत्येक आयफोनमागे फक्त ३० डॉलर्स मिळतात, जे आयफोनच्या किमतीच्या ३ टक्क्यांपेक्षा कमी आहे. परंतु उत्पादन प्रकल्पातून कमी उत्पन्न मिळत असले तरी, यातून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मीती होते. चीनमध्ये सुमारे ३ लाख आणि भारतात ६० हजार कामगार या उत्पादन प्रकल्पांमध्ये काम करतात. याच कारणामुळे डोनाल्ड ट्रम्प यांना ऍपलने त्यांचे उत्पादन प्रकल्प अमेरिकेत हलवावे असे वाटत आहे.
भारतातून अॅपलचे उत्पादन प्रकल्प हलवल्यास अमेरिकेत सुरुवातीच्या स्तरावरील नोक-या निर्माण होतील, परंतु अॅपलसाठी उत्पादन खर्च अनेक पटीने वाढेल. भारतात अॅपल उत्पादन प्रकल्पात काम करणा-या कामगारांना दरमहा सरासरी २९० अमेरिकन डॉलर्स इतका पगार मिळतो. पण प्रकल्प अमेरिकेत हलवल्यास, अमेरिकेच्या किमान वेतन कायद्यांनुसार तेथे कामगारांना २९०० डॉलर्स पगार द्यावा लागेल. आयफोन डिव्हाइस असेंब्लीचा खर्च ३० डॉलर्सवरून ३९० डॉलर्सपर्यंत वाढेल. एकूणच, अॅपलने आयफोनची किंमत वाढवली नाही तर प्रति डिव्हाइस नफा ४५० डॉलर्सवरून ६० पर्यंत कमी होईल.
अडीच लाख रोजगार जाणार
भारतात आयफोन उत्पादने करू नका, असा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलेला सल्ला अॅपलचे सीईओ टिम कुक यांनी मानला, तर भारताला अॅपलच्या साडेचार लाख कोटींच्या गुंतवणुकीपासून वंचित राहावे लागेल, तसेच सुमारे अडीच लाख रोजगारालाही मुकावे लागेल.
१.५ लाख कोटीची निर्यात
अॅपलने २०२३-२४ या आर्थिक वर्षात भारतात १.१६ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक केली असून, येत्या पाच वर्षांच्या काळात ३.३२ लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीची तयारी केली आहे. २०२४-२०२५ या आर्थिक वर्षात भारतातून १.५ लाख कोटी रुपयांचे आयफोन निर्यात झाले.