नवी दिल्ली : वृत्तसंस्था
९ एप्रिलपासून अतिरिक्त आयात शुल्क लावण्याच्या निर्णयामुळे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प जगभरात टीकेचे धनी झाले आहेत. २६ टक्के शुल्क लादल्याने निर्माण होणा-या परिस्थितीवर भारत लक्ष ठेवणार असून कोणतीही घाईघाईने पावले उचलणार नाही, असे सूत्रांनी सांगितले. अमेरिकेने भारताला वाईट व्यापार पद्धतींचा ‘सर्वात वाईट गुन्हेगार’ म्हणून संबोधून शुल्क लादले आहे. दरम्यान, भारत आणि अमेरिका प्रस्तावित द्विपक्षीय व्यापार करार लवकरात लवकर पूर्ण करण्यास उत्सुक असल्याचे सूत्रांनी सांगितले.
या शुल्कवाढीमुळे भारताच्या जीडीपीवर ०.५० टक्क्यांनी परिणाम होणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला असून, टेरिफमुळे अमेरिकेसह संपूर्ण जगात मंदी येऊ शकते, असे जेपी मॉर्गनने इशारा देताना म्हटले आहे. ट्रम्प यांनी शुल्कवाढ करताच त्याचा परिणाम भारतासह जगभरातील शेअर बाजारांवर झाला असून, बाजार कोसळले आहेत.
भारत आणि अमेरिका यांच्यातील प्रस्तावित द्विपक्षीय व्यापार करार भारतीय उद्योगांना या शुल्कांच्या प्रभावातून सावरण्यास मदत करू शकतो. भारताने व्यापार सुलभ करण्यासाठी पावले उचलली, लॉजिस्टिक सुधारले आणि धोरण स्थिर ठेवले तर या परिस्थितीतून चांगल्या संधी मिळू शकतात. भारताला आपली उत्पादने जागतिक दर्जाची बनवावी लागतील. अमेरिकेने चीनवर सर्वाधिक ५४%, व्हिएतनामवर ४६%, बांगलादेशवर ३७% आणि थायलंडवर ३६% कर लावला आहे.
अमेरिका टॅरिफच्या बाबतीत जशास तसा प्रतिसाद देईल. ज्या देशांना अमेरिकन बाजारात प्रवेश हवा आहे त्यांना किंमत मोजावी लागेल. कोणत्याही कंपनीला टॅरिफमधून सूट हवी असेल तर तिला तिची उत्पादने अमेरिकेत तयार करावी लागतील. टेरिफमुळे अमेरिकेचा विकास होईल.
जीडीपीवर काय परिणाम?
डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने जाहीर केलेल्या जशास तशा शुल्कामुळे चालू आर्थिक वर्षात भारताचा सकल देशांतर्गत उत्पादन (जीडीपी) वाढीचा दर ०.५० टक्क्यांवरून सहा टक्क्यांनी घसरण्याची शक्यता आहे.