नवी दिल्ली : वृत्तसंस्था
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर लादलेला २६% रेसिप्रोकल टॅरिफ (परस्पर कर) देशाच्या निर्यातीसाठी मोठा धक्का ठरणार आहे. या निर्णयामुळे देशातील अनेक उद्योगांवर संकट ओढवण्याची चिन्हे दिसत आहेत. हा कर भारतीय अर्थव्यवस्थेसाठी कसा अनर्थकारी ठरू शकतो आणि कोणती प्रमुख क्षेत्रे यामुळे धोक्यात येऊ शकतात, त्याचा हा गोषवारा…
९ एप्रिलपासून अंमलबजावणी : डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतासाठी मोठा व्यापार धोका निर्माण केला आहे. ‘लिबरेशन डे’ भाषणात त्यांनी भारतातील सर्व निर्यात होणा-या वस्तूंवर किमान २६% कर लागू करण्याची घोषणा केली. याची अंमलबजावणी ९ एप्रिलपासून होणार आहे. हा निर्णय भारतीय उद्योगांसाठी मोठे संकट निर्माण करू शकतो.
ट्रम्प म्हणाले, भारत आमच्या वस्तुंवर ५२% शुल्क लावतो, आणि आम्ही मात्र अनेक वर्षे जवळपास काहीच कर लावला नाही. त्यांच्या मते, हा नवीन कर व्यापार संतुलन सुधारण्यासाठी आणि भारतावर दबाव आणण्यासाठी लागू करण्यात आला आहे. सध्या अमेरिकेची भारतासोबतची व्यापार तूट ४६ अब्ज डॉलर इतकी आहे आणि ट्रम्प यांनी स्पष्ट केले आहे की, ही तूट भरून निघेपर्यंत हे कर लागू राहतील.
भारतावर काय परिणाम होणार? : या करामुळे भारतातील अनेक उद्योगांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. मोठ्या कंपन्यांपासून लघु-मध्यम उद्योगांपर्यंत अनेक व्यवसायांवर याचा आर्थिक परिणाम जाणवेल. भारत अमेरिकन वस्तूंवरील २३ अब्ज रूपये कर कमी करण्याचा विचार करत आहे. ज्यात हिरे, दागिने, फार्मास्युटिकल्स, स्टील तसेच कृषी, आणि ऑटो पार्टस् यांचा समावेश आहे. मात्र, अद्याप कोणताही अंतिम करार झाला नाही.
व्यापार युद्धाचाच पर्याय
पुढील काही आठवडे भारतासाठी निर्णायक ठरणार आहेत. भारताने त्वरित कारवाई केली नाही, तर हा कर देशाच्या निर्यातीत मोठी घसरण करू शकतो. आता केंद्र सरकारकडे दोन पर्याय आहेत. अमेरिकेशी वाटाघाटी करून त्यांच्या वस्तूंवरील कर कमी करणे किंवा व्यापारयुद्धासाठी तयार राहणे. ट्रम्प यांनी लादलेला २६% कर भारतासाठी मोठे आव्हान आहे. याचा दीर्घकालीन प्रभाव टाळण्यासाठी भारतीय उद्योगांनी निर्यात कार्यक्षमता सुधारून आणि उच्च मूल्यवर्धन करून उपाय शोधण्याची गरज आहे.
सेन्सेक्स, निफ्टी गडगडले
अमेरिकेच्या रेसिप्रोकल टेरिफ अंमलबजावणीच्या पार्श्वभुमीवर आज, गुरूवारी शेअर बाजारात सेन्सेक्स आणि निफ्टी या निर्देशांकांत घसरण झाली. परदेशी गुंतवणूकदारांनी १,५३८ कोटींचे शेअर्स विकले. तसेच देशांतर्गत गुंतवणूकदारांनी २,८०८ कोटींचे शेअर्स खरेदी केले आहेत. भारतीय शेअर बाजारात सेंसेक्स ३२२ अंकांनी घसरून ७६,२९५ पातळीवर बंद झाला. निफ्टीमध्येही ८२ अंकांची घसरण झाली आणि तो २३,२५० पातळीवर बंद झाला. बुधवारी सेंसेक्स ५९२ अंकांनी वाढून ७६,६१७ वर बंद झाला होता तर निफ्टीतही १६६ अंकांची वाढ होऊन तो २३,३३२ च्या स्तरावर बंद झाला होता.