कोल्हापूर : प्रतिनिधी
विमानाच्या धर्तीवर ट्रॅक्टर ट्रॉल्यांना सुद्धा जीपीएस आणि ब्लॅक बॉक्स (ईडीआर अर्थात इव्हेंट डेटा रेकॉर्डर ) बसवण्याचा विचार केंद्र सरकार करीत आहे. मात्र या निर्णयाला पहिला थेट विरोध कोल्हापुरातून झाला आहे. काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी आज कोल्हापूरमध्ये पत्रकार परिषद घेऊन यासंदर्भात हरकती नोंदवण्याचे आवाहन केले आहे. याविषयीची अधिसूचना रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने १८ जुलै, २०२५ रोजी जारी केली आहे.
हा कायदा होऊ पाहत आहे आणि त्याला आत्ताच हरकती घेत असल्याचे सतेज पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. या संदर्भात वेळ पडल्यास आम्ही ट्रॅक्टर मोर्चा काढू असा इशारा सुद्धा त्यांनी दिला. ते म्हणाले की, राज्य सरकारने सुद्धा याबाबत भूमिका घ्यावी, असे ते म्हणाले.
ते म्हणाले की, ट्रॅक्टरला ब्लॅक बॉक्स बसवण्याची आयडिया कोणाच्या डोक्यातून आली हे कळायला मार्ग नाही. लोकांना आधीच हमीभाव नाही. त्यामध्ये आता हा २५,००० पर्यंत आर्थिक बोजा पडणार आहे. त्यामुळे आम्ही ईडीआर आणि जीपीएस बनवणारी कोणती कंपनी आहे का? याबाबत माहिती घेतली पण अद्याप त्याची माहिती मिळाली नाही. ते म्हणाले की, या निर्णयावर अधिसूचना काढण्यात आली आहे. ईडीआर आणि जीपीएस ट्रॅक्टरवर लावायची काही गरज आहे का? १८ तारखेपर्यंत सर्व शेतक-यांनी हरकती नोंदवाव्यात असे आवाहन त्यांनी केले.