मुंबई : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी कोणत्याही आमदारांना अपात्र ठरवले नाही. पण शिवसेना एकनाथ शिंदे यांचीच असल्याचा निर्णय दिला. राहुल नार्वेकरांच्या या निर्णयानंतर उद्धव ठाकरे यांच्याकडून टीकास्त्र सोडण्यात आले. पण एकनाथ शिंदे यांच्या नेत्यांकडून त्यांचे कौतुक करण्यात आले. उद्योग मंत्री उदय सामंत यांनी आज मोठा दावा केला आहे. उद्धव ठाकरे गटातील आमदार एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत, असा दावा सामंतांनी केला आहे. रत्नागिरीमध्ये उद्योग मंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला.
उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार आमच्याकडे येणार आहेत. १४ तारखेपासून काय होते आहे ते पाहा, असा दावा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केला. यावेळी त्यांनी मिलिंद देवरा यांच्या पक्षप्रवेशावरही मत व्यक्त केले.
मिलिंद देवरा यांच्यासारख्या नेत्याची एकनाथ शिंदे यांना साथ मिळाली तर मुंबईत शिवसेना भक्कम होईल. त्यांच्या मनात पक्षात येण्याची इच्छा असेल तर शिंदे यांचे नेतृत्व स्वीकारून वंदनीय बाळासाहेबांचा विचार पुढे नेण्यासाठी शिवसेनेत प्रवेश करावा. सहकारी म्हणून देवरा यांचा चेहरा मिळाला तर शिवसेनेची ताकद फार मोठ्या पद्धतीने वाढेल, असे उदय सामंत म्हणाले. मिलिंद देवरा लोकांमध्ये जाऊन काम करणारे नेतृत्व आहे. मुरली देवरा साहेबांचा त्यांना वारसा आहे. अनेक माजी आमदार त्यांच्यासोबत काम करतात, असेही सामंत म्हणाले.
महाविकास आघाडीवर हल्लाबोल
ज्या महाविकास आघाडीला पंतप्रधानांचा चेहरा नाही त्यांचा आम्ही विचार करत नाही. पहिले त्यांनी पंतप्रधानाचा चेहरा जाहीर करावा. नरेंद्र मोदी यांच्या विरोधात १० ते २० टक्के मतदान घेणारा चेहरा त्यांनी जाहीर करावा. हे सैरभैर झालेत कारण यांच्याकडे पंतप्रधानांचा चेहरा नाही, असे उदय सामंत म्हणाले.