राज ठाकरे विदेशात, २९ एप्रिलपर्यंत न बोलण्याच्या सूचना
मुंबई : प्रतिनिधी
मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी ठाकरे गटाचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एकत्र येण्याची साद घातली. यानंतर उद्धव ठाकरेंनीही प्रतिसाद दिला. यानंतर गेल्या दोन दिवसांपासून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या एकत्र येण्यावरून विविध राजकीय चर्चा सुरू झाली. राज्यातील विविध पक्षांतील नेत्यांनीही ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चांवर प्रतिक्रिया दिली. मात्र आता राज ठाकरेंनी युतीचा विषय संवेदनशील असून, २९ एप्रिलपर्यंत यावर कोणीही भाष्य करू नये, अशा सूचना मनसे नेत्यांना दिल्या.
मनसेप्रमुख राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीच्या प्रश्नाबाबत २९ तारखेपर्यंत बोलू नका, अशा सूचना राज ठाकरे यांनी दिल्या असल्याचे मनसेचे ज्येष्ठ नेते प्रकाश महाजन यांनी सांगितले. राज ठाकरे सध्या परदेशात आहेत. त्यामुळे मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाच्या युतीचा विषय संवेदनशील आहे. त्यामुळे २९ एप्रिलपर्यंत कोणीही बोलू नये, अशा सूचना राज ठाकरेंकडून मनसेच्या नेत्यांना देण्यात आल्या आहेत.
छ. संभाजीनगरला
नेत्यांमध्ये मनोमिलन
छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेना ठाकरे गट आणि मनसेमध्ये मनोमिलन झाल्याचे दिसून आले. मनसे नेते सुहास दशरथे यांनी शिवसेना ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरेंची भेट घेतली. ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याच्या पार्श्वभूमीवर ही भेट झाल्याचे बोलले जात आहे. दोन्ही भाऊ एकत्र येणार आहेत. याचा आनंदच आहे, असे माजी खा. चंद्रकांत खैरे म्हणाले तर दाशरथे यांनी याबाबत बोलण्यास नकार दिला.