39.2 C
Latur
Sunday, April 20, 2025
Homeमहाराष्ट्रठाकरे बंधू एकत्र येणार?

ठाकरे बंधू एकत्र येणार?

राज ठाकरेंची साद, उद्धव ठाकरेंचा त्वरित प्रतिसाद
मुंबई : प्रतिनिधी
राजकीय अस्तित्वाची लढाई लढत असलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज मराठी माणसाच्या, महाराष्ट्राच्या हितासाठी आम्ही एकत्र येऊ शकतो, असे सांगत उद्धव ठाकरे यांना साद घातली तर महाराष्ट्राद्वेषी लोकांशी संबंध तोडण्याची राज यांची तयारी असेल तर आपणही तयार असल्याचे सांगत त्यांना प्रतिसाद दिल्याने महाराष्ट्राचे राजकारण आज अचानक ढवळून निघाले. महाराष्ट्र, मराठी माणसाची अस्मिता यांच्या समोर आमच्यातील वाद-भांडणे क्षुल्लक आहेत. आम्ही एकत्र येणे फार कठीण आहे, असे वाटत नसल्याचे राज ठाकरे म्हणाले तर उद्धव ठाकरे यांनी, आमच्यात भांडणे कधीच नव्हती, जी होती ती मिटवून टाकली चला; पण भाजपासोबत जायचे की माझ्यासोबत हे एकदा ठरवा. महाराष्ट्र विरोधी लोकांसोबत संबंध ठेवणार नाही, अशी शपथ शिवरायांसमोर घ्या, अशी अट उद्धव ठाकरे यांनी घातली.

महाराष्ट्राच्या राजकारणात गेली अनेक वर्षे ज्या संभाव्य राजकीय घडामोडीची सातत्याने चर्चा होत असते ती प्रत्यक्षात येण्याचे धूसर संकेत दिसायला लागले आहेत. राजकीयदृष्ट्या अडचणीत असलेले ठाकरे बंधू एकत्र येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. खुद्द मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी टाळीसाठी हात पुढे केला असून उद्धव ठाकरे यांनीदेखील त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला. महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या पाच-सहा वर्षांत प्रचंड उलथापालथी झाल्या. आता महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा ठाकरे बंधू एकत्र येण्याचे ठोस संकेत दिसायला लागले आहेत. खुद्द राज ठाकरे यांनीच त्यासाठी पुढाकार घेतला. प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्या यू ट्युब चॅनलसाठी दिलेल्या मुलाखतीत राज ठाकरे यांनी नव्या राजकीय समीकरणाचे संकेत देऊन महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवून दिली.

एकत्र येणे कठीण नाही;
पण त्यांची इच्छा हवी
महाराष्ट्र खूप मोठा आहे. महाराष्ट्र, मराठी माणसाच्या अस्तित्वासमोर आमच्यातील भांडणे, वाद हे अतिशय क्षुल्लक आहेत. आम्ही एकत्र येणे फार कठीण आहे, असे वाटत नाही. अर्थात हा माझ्या इच्छेचा किंवा स्वार्थाचा विषय नाही. उलट मी तर म्हणतो की, संपूर्ण महाराष्ट्रातील मराठी लोकांनी एकत्र येऊन एकच पक्ष काढावा. मी आयत्या पिठावर रेघोट्या मारणा-यांतील नाही. त्या वेळी मी उद्धवसोबतदेखील काम करू शकत होतो; पण समोरच्याची इच्छा आहे का मी सोबत काम करावे? हा प्रश्न आहे. यात मी कोणताही अहंकार मध्ये आणत नाही, असे राज ठाकरे म्हणाले.

मराठीच्या हितासाठी
एकत्र येण्यास तयार
महाराष्ट्र-मराठीच्या हितासाठी किरकोळ भांडणे बाजूला ठेवून मी यायला तयार आहे. मुळात आमच्यात भांडणे नव्हतीच, असतील तर ती मिटवून टाकली चला; पण हेच मी लोकसभेच्या वेळेला सांगत होतो की, गुजरातला हे उद्योग घेऊन चालले आहेत. तेव्हाच विरोध केला असता तर हे सरकार न बसता महाराष्ट्राच्या हिताचे सरकार बसले असते. महाराष्ट्राच्या हितासाठी ही किरकोळ भांडणे बाजूला ठेवायला मी तयार आहे; पण महाराष्ट्राच्या हिताच्या आड जो कोणी येईल, त्याला घरात बोलावयाचे नाही. मराठी माणसांनी आता ठरवावे की भाजपासोबत जायचे की माझ्यासोबत यायचे. महाराष्ट्राचे हित ही एकच शर्त आहे. या चोरांच्या गाठीभेटी घ्यायच्या नाहीत. कळत नकळत पाठिंबा द्यायचा नाही, अशी शिवरायांची शपथ घ्या मग टाळी देण्याची हाळी द्या, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

एकत्र आल्यास आनंदच वाटेल
राज आणि उद्धव ठाकरे हे दोघे बंधू जर एकत्र येणार असतील तर आम्हाला आनंदच आहे. कोणी जर आपापसातील मतभेद विसरून एकत्र येत असतील तर वाईट वाटण्याचे कारणच नाही, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

हा त्यांचा अंतर्गत प्रश्न : अजित पवार
मनसे अध्यक्ष म्हणून राज ठाकरे हे स्वत: काम करतात तसेच शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख म्हणून उद्धव ठाकरे हे काम करतात. त्यामुळे त्यांनी त्यांच्या दोन्ही पक्षाबाबत काय भूमिका घ्यावी हा प्रश्न त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. प्रत्येकाने सद्सद्विवेक बुद्धीला स्मरून योग्य तो निर्णय घ्यावा, असे अजित पवार म्हणाले.

 

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR