सोलापूर : इंग्रजीवर प्रभुत्व, राहणीमान साधे, कौटुंबिक स्थिती बेताची, अशा परिस्थितीत सॅमसन रूबेन डॅनिअलने वयाच्या १७ व्या वर्षीपासून चोरीचा मार्ग निवडला. सध्या त्याचे वय २६ असून त्याने नऊ वर्षात तब्बल १०० पेक्षा जास्त ठिकाणी चोरी, घरफोडी केली आहे.
सोलापूर शहर गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक संदीप पाटील यांच्या नेतृत्वातील पथकाने त्याला जेरबंद केल्यावर सॅमसनची संपूर्ण कहाणी उघड झाली.
ठाणे जिल्ह्यातील कल्याण वेस्ट परिसरात राहायला असलेला सॅमसन डॅनिअल स्वतःकडे मोबाईल ठेवत नव्हता.
पोलिसांना आपल्याला सहजपणे पकडता येऊ नये, याची खबरदारी तो घेत होता. त्याने मध्यप्रदेश, गुजरात, सोलापूरसह ठाणे, रत्नागिरी, सांगली, जळगाव अशा जिल्ह्यांमध्ये देखील चोरी, घरफोड्या केल्या आहेत. त्या सर्व ठिकाणी तो रेल्वेतूनच आला आणि गेला, अशीही माहिती तपासात समोर आली आहे. ठाण्यातून मध्यरात्री रेल्वेत बसायचा आणि सकाळी सोलापुरात येऊन दिवसा चोरी, घरफोडी करून रात्री तो रेल्वेने ठाण्याला जात होता.
विशेष बाब म्हणजे शनिवार, रविवारी अनेकजण घर बंद करून बाहेरगावी फिरायला किंवा शॉपिंगला जातात म्हणून तो आवर्जून त्या दिवशी सोलापूरमध्ये यायचा, असेही पोलिसांनी सांगितले. पण, त्याने सोलापुरातून चोरलेला मोबाईल सिमकार्ड काढून बायकोला वापरासाठी दिला आणि तेथेच तो फसला. सायबर पोलिसांच्या मदतीने शहर गुन्हे शाखेचे पथक त्याच्यापर्यंत पोचलेच. गुन्हेगार कितीही हुशार असला, तरी पोलिस त्याच्यापर्यंत पोचतातच हे या गुन्ह्यात पहायला मिळाले.
सोलापूर शहरातील सदर बझार पोलिस ठाण्याच्या हद्दीतून दागिने व मोबाईल चोरणाऱ्या सॅमसन रूबेन डॅनिअल याला पोलिसांनी पकडले. त्यावेळी त्याने यापूर्वी विजापूर नाका पोलिस ठाण्याच्या हद्दीत सात ठिकाणी चोरी केली होती आणि त्यावर गुन्हे देखील दाखल असल्याचे समोर आले. सोलापूर शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेने अधिक तपास केला, त्यावेळी त्याच्यावर मध्यप्रदेश, गुजरात व महाराष्ट्रातील सोलापूर, ठाणे, रत्नागिरी, सांगली, जळगाव अशा विविध जिल्ह्यांमधील ३० पेक्षा जास्त पोलिस ठाण्यांमध्ये १०० हून अधिक गुन्हे दाखल असल्याचीही धक्कादायक माहिती समोर आली.
सोलापुरातून चोरीला गेलेल्या एका मोबाईलचे लोकेशन ठाण्यात दाखवत होते. मोबाईलच्या आयएमईआय नंबरवरून मोबाईल कोणाकडे आहे, याचा तपास केला. त्यावेळी यापूर्वी सोलापुरात चोरीचे गुन्हे दाखल असलेल्या चोरट्याच्या पत्नीकडे मोबाईल असल्याची बाब समोर आली. त्यानुसार वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या पथकाने सदर बझार पोलिस ठाण्याच्या हद्दीत चोरी करणाऱ्या त्या चोरट्याला ठाणे येथून ताब्यात घेतले.असे सहायक पोलिस निरीक्षक (गुन्हे) संदीप पाटील यांनी सांगीतले.