38.6 C
Latur
Wednesday, April 16, 2025
Homeमहाराष्ट्रठाण्यात मागील वर्षभरात दोन हजार बालकांवर अत्याचार

ठाण्यात मागील वर्षभरात दोन हजार बालकांवर अत्याचार

बालकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

ठाणे :
ठाणे जिल्ह्यात २ हजार २७ बालके अन्याय, अत्याचाराने पीडित आहेत. ही गंभीर बाब आहे. ठाणे जिल्ह्यात गेल्या वर्षभरात अन्याय आणि अत्याचारात बळी गेलेल्या बालकांची संख्या १५ एवढी आहे. तर इतर अन्याय आणि अत्याचार झाल्याच्या गंभीर घटनांची संख्या ही धक्कादायक आहे. तब्बल ३६० घटना समोर आल्याची माहिती सूत्रांनी दिली. याशिवाय, अपहरणासह इतर गंभीर घटना मिळून जिल्ह्यात तब्बल दोन हजार २७ बालकांवर अन्याय, अत्याचार झाल्याच्या गंभीर घटना प्रकाशझोतात आल्या आहेत.

ठाणे जिल्ह्यात अल्पवयीन मुला-मुलींवर होणा-या अत्याचाराचा आकडा गंभीर आहे. कडक कायद्याची अंमलबजावणी केल्यानंतरही अत्याचार आणि छळाचा वाढता आलेख कमी करण्यासाठी ठाणे पोलिस प्रशासन सतर्क झाले आहे. मात्र पालकांनीही सतर्क होणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे सेवाभावी सामाजिक संघटनेच्या सहभागाने जनजागृती करून यावर नियंत्रण मिळवणं शक्य होईल. यासाठी पोलिसांसोबत काम करताना सामाजिक संघटनांना विशेष अधिकार दिल्याने प्रक्रिया गतिमान होईल. त्यामुळे वाढत्या घटनांना आळा घालण्यात यश मिळेल, अशी आशा मदत संस्थेच्या संचालिका शशी अग्रवाल यांनी व्यक्त केली.

खडवलीतील बेकायदा वसतिगृहात २९ बालकांवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना प्रशासनाच्या सतर्कतेने दोन दिवसांपूर्वी उघड झाली आहे. गेल्या वर्षात दोन हजार २७ बालकांवर अत्याचार झाल्याचे गुन्हे देखील नोंदवण्यात आलेले आहेत.

वसतिगृहातील वास्तव
वसतिगृहात राहणा-या बालकांवर होणा-या अन्याय आणि अत्याचाराच्या प्रकारांमुळे बालकांच्या सुरक्षेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे. ग्रामीण भागातील वसतिगृहात राहणा-या मुलांच्या पालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. बालकांना शिक्षण आणि जीवनाला एक चांगली लागणारी शिस्त यामुळे ग्रामीण, दुर्गम भागातील मुले वसतिगृहाच्या आश्रयाने राहतात. त्यामुळेच एकट्या बालकावर अत्याचार होत असल्याने बालकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे.

अत्याचारानंतर, अपहरण होण्याचा ससेमिरा : बालकांवरील अन्याय-अत्याचार या व्यतिरिक्त बालकांचे अपहरण आणि पळवून नेण्याच्या घटनांचा विक्रमच म्हणावा लागेल. १ हजार ५२६ बालकांचे अपहरण आणि पळवून नेल्याच्या नोंदी आहेत. त्यात दोन बालकांना सोडून देण्यात आले, तर प्रत्यक्षात २२५ बालकांना गंभीर घटनांना तोंड द्यावे लागल्याची बाब निदर्शनास आली आहे, अशी माहिती पोलिस अधिकारी चेतना चौधरी यांनी दिली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR