32.7 C
Latur
Tuesday, April 1, 2025
Homeसंपादकीयडळमळले म्यानमार!

डळमळले म्यानमार!

म्यानमार, थायलंडमध्ये शुक्रवारी झालेल्या भीषण भूकंपात हजारो लोकांचे बळी गेले आहेत. म्यानमारमध्ये बळी गेलेल्यांची संख्या दीड हजाराहून अधिक तर जखमींची संख्या चार हजारहून अधिक आहे. भूकंपानंतर कोसळलेल्या इमारतींच्या ढिगा-याखाली अनेक लोकांचा मृत्यू झाला असून, मृतदेह बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. म्यानमार आणि थायलंडला शुक्रवारी दुपारी ७.७ रिश्टर स्केलचा जबरदस्त धक्का बसला. अनेक ठिकाणी इमारती जमीनदोस्त झाल्या. राजधानी नेपिर्तो येथे वीजपुरवठा, टेलिफोन, इंटरनेट सेवा ठप्प झाली. म्यानमारमधील लष्करी प्रशासनाने म्हटले आहे की, १६०० हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला असून ४ हजारहून अधिक नागरिक जखमी आहेत. भूकंपामुळे परिस्थिती अधिकच बिकट झाली आहे. सुमारे १० हजारहून अधिक लोकांचे बळी गेले असावेत अशी भीती व्यक्त केली जात आहे. म्यानमारमध्ये दीर्घ काळापासून नागरी संघर्ष सुरू असून, त्यामुळे येथे अनेक समस्या तयार झाल्या आहेत. थायलंडमध्ये भूकंपामुळे राजधानी बँकॉकला मोठा फटका बसला. येथे दोन हजारहून अधिक इमारती कोसळल्या आहेत.

लोकांना ढिगा-याखालून बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. म्यानमारमध्ये भूकंपाने मोठा विध्वंस केला असून या भूकंपाची तीव्रता ३३४ अणुस्फोटांच्या बरोबरीची होती. बँकॉकमध्ये चतुरक या ३० मजली निर्माणाधीन इमारतीच्या ढिगा-याखालून १० मृतदेह बाहेर काढण्यात आले. म्यानमार व थायलंड भूकंपपीडितांसाठी जगभरातून मदतीचा ओघ सुरू झाला आहे. भारताने ‘ऑपरेशन ब्रह्म’ अंतर्गत १५ टन बचावसाहित्य म्यानमारला रवाना केले आहे. सी-१३० विमानाने हे साहित्य पाठवण्यात आले असून यात तंबू, ब्ल्ँकेट, ताडपत्री, सोलर दिवे, स्लीपिंग बॅग, जेवणाची तयार पाकिटे, जनरेटर, आवश्यक वैद्यकीय औषधे पाठवण्यात आली आहेत. बचाव कार्यात सहभागी होण्यासाठी एनडीआरएफचे ८० जणांचे एक पथकही पाठवण्यात आले आहे.

अमेरिकेने दोन विमाने आणि १२७ जणांचे बचाव पथक पाठवले आहे. त्याबरोबरच ढिगा-याखालील व्यक्तींचा शोध घेणारी उपकरणे, ऊर्जानिर्मितीची विविध उपकरणे पाठवली आहेत.दक्षिण कोरियाने १६.५ कोटी रुपयांचे साहित्य पाठवले असून मलेशियाने मदतकार्यासाठी तज्ज्ञांची टीम पाठवली आहे. चीनने एकूण ११५ कोटी रुपयांची मदत पाठवली आहे. त्यांनी तंबू, ब्लॅँकेट, प्रथमोपचार साहित्य, भोजन, पिण्याचे पाणी व इतर जीवनावश्यक वस्तू पाठवल्या आहेत. जगावर संकट कोसळले की सारे जग कसे एकवटते याचे हे उदाहरण आहे. भूगर्भ शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार हा थायलंडमधील २०० वर्षांतील सर्वांत मोठा भूकंप आहे. भूकंपाचे धक्के इतके तीव्र होते की, केंद्रापासून शेकडो किमी दूर असलेल्या बँकॉकमधील इमारती नष्ट झाल्या. संयुक्त राष्ट्राने मदतीसाठी ४३ कोटी रुपये दिले आहेत. रशियाच्या आपत्कालीन खात्याने १२० बचाव कर्मचारी व मदतीचे सामान, दोन विमाने पाठवली आहेत.

म्यानमारमधील अत्यावश्यक सामग्रीचा तुटवडा पाहता बचाव व मदतकार्य संथगतीने सुरू आहे. म्यानमारमध्ये भूकंपाची मालिकाच सुरू आहे. गत तीन दिवसांत तेथे ५ रिश्टर स्केलचे तीन भूकंप झाले आहेत. म्यानमारमधील मोठ्या भूकंपाने त्याचे परिणाम भारत, थायलंडसारख्या शेजारी देशांनाही जाणवले. या भूकंपाने लोकांना निसर्गाच्या सामर्थ्याची आणि कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीसाठी तयार राहण्याची गरज लक्षात आणून दिली. तीव्रतेच्या बाबतीत सर्वांत मोठा भूकंप १९६० मध्ये चिलीमध्ये झाला होता. रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता ९.४ ते ९.६ होती. २२ मे १९६० रोजी दुपारी झालेला हा भूकंप इतका तीव्र होता की त्यातून निर्माण झालेल्या त्सुनामी लाटा चिली, हवाई, जपान, फिलीपीन्स, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझिलंडपर्यंत पोहोचल्या. म्यानमारमधील सागांग फॉल्ट हा भूकंपप्रवण भाग आहे. २०१२ मध्ये येथे ६.८ रिश्टर स्केलचा भूकंप झाला होता. शुक्रवारचा भूकंप गत ७५ वर्षांतील सर्वांत मोठा होता, असे ‘रॉयटर्स’ने म्हटले आहे. हा भूकंप जमिनीपासून फक्त १० कि.मी. खोलवर होता. त्यामुळे झटके तीव्र होते आणि इमारतींना त्याची झळ बसली. भूकंपाचे हादरे अतिशय तीव्र होते आणि सुमारे चार मिनिटे ते जाणवले.

थायलंडमधील ३० मजली इमारत पत्त्याच्या बंगल्यासारखी कोसळली. या इमारतीचे बांधकाम तीन वर्षांपासून सुरू होते. त्यात जवळपास ५.९ कोटी डॉलर्सची गुंतवणूक करण्यात आली होती. भूकंप म्हणजे जमिनीखालील हालचालींमुळे होणारे कंपन. जमिनीखालील दोन मोठे थर (ब्लॉक) अचानक एकमेकांवर आदळतात तेव्हा भूकंप होतो. यातून निर्माण होणारी ऊर्जा भूकंपीय लहरींच्या रूपात बाहेर पडते. या लहरी जमिनीत पसरतात आणि त्यामुळे जमीन हादरते. जमिनीचा बाहेरील थर (क्रस्ट) टेक्टोनिक प्लेटस्मध्ये विभागलेला आहे. या प्लेटस् सतत हळूहळू हलत असतात. त्या एकमेकाजवळ सरकतात किंवा टक्कर होते. त्यांचे किनारे खडबडीत असल्याने त्या अडकतात पण बाकी भाग थरथरत राहतो. जेव्हा या प्लेटस् खूप दूर सरकतात आणि किनारा मोकळा होतो, तेव्हा भूकंप होतो. जमिनीखाली भूकंप होणा-या जागेला ‘हायपोसेंटर’ म्हणतात, तर त्याच्या वरच्या जमिनीवरील ठिकाणाला ‘एपिसेंटर’ म्हणतात. भूगर्भातील हालचालींमुळे प्रचंड प्रमाणात ऊर्जेचे उत्सर्जन होते आणि त्यामुळे भूकंप तयार होऊन पृथ्वीच्या पृष्ठभागाची हालचाल होते. परिणामी जमीन थरथरणे, हलणे, जमिनीला भेगा पडणे, कंपन होणे अथवा भूकवच अचानक काही क्षण हादरणे यासारख्या घटना घडतात.

भूकंप प्रामुख्याने पृथ्वीच्या कवचाच्या कोणत्याही भागामध्ये समतोल नसल्यामुळे होतो. पृथ्वीच्या आत वायूचा विस्तार व आकुंचन, मानवनिर्मित हायड्रोस्टॅटिक दाब, जलाशय, तलाव यासारखे जलस्रोत आणि प्लेटस्च्या हालचाली भूकंपाला कारणीभूत ठरतात. म्यानमारमधील विनाशकारी भूकंपाचे रहस्य तेथील भूगर्भात दडलेले आहे. भूकंपाचा केंद्रबिंदू मध्य म्यानमारमध्ये होता, जो मंडाले शहरापासून सुमारे १७.२ किलोमीटर अंतरावर आहे. त्यामुळे त्याचा फटका शेजारील देश थायलंडलाही बसला. भूकंपानंतर म्यानमार आणि थायलंडमध्ये राष्ट्रीय आणीबाणी घोषित करण्यात आली आहे. सध्या जगभरातील अनेक देश म्यानमारच्या मदतीसाठी पुढे येत आहेत. संकटकाळात एकमेकांना मदत करणे यातच मानवजातीचे कल्याण आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR