नागपूर : विशेष प्रतिनिधी
उपमुख्यमंत्री अजित पवार अचानक गायब होण्यामागे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांची नाराजी असल्याचे म्हटले जात आहे. मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने भुजबळ प्रचंड नाराज असून ते नागपुरहून अधिवेशन सोडून नाशिकला परतले आज त्यांनी कार्यकर्ता मेळावा घेतला.
छगन भुजबळ यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांना थेट लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अखेरपर्यंत माझ्या नावासाठी आग्रही होते. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीच मला तसे सांगितले होते. मला मंत्रिमंडळातून वगळण्यात आल्यानंतर विरोधी पक्षांसह अगदी भाजपमधून अनेक जणांनी आश्चर्य व्यक्त केले, असे भुजबळ म्हणाले.
भुजबळ अजित पवारांवर टिकेचा भडीमार करत असल्याने सार्वजनिक ठिकाणी गेल्यास माध्यमांचे प्रतिनिधी गाठतील. त्यांच्याकडून प्रश्न विचारले जातील. त्यांना उत्तरे द्यावी लागतील. त्यापेक्षा नॉट रिचेबल राहणे योग्य ठरेल, असा सल्ला अजित पवारांना देण्यात आला होता. त्यामुळेच अजित पवार नागपुरात असूनही बंगल्यातून बाहेर पडले नाहीत. अजित पवारांच्या पक्षाची पीआर स्ट्रॅटर्जी सांभाळण्याचे काम ‘डिझाईन बॉक्स’ नावाची कंपनी करते.
रविवारी मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. त्यानंतर सोमवारपासून अजित पवार विधानभवनात आलेच नाही. मंगळवारीही ते फिरकले नाहीत. अखेर आज दोन दिवसांनंतर अजित पवार विधिमंडळात आले. नागपुरात असलेले अजित पवार २ दिवस बंगल्याबाहेर पडलेच नाहीत. भुजबळ यांना मंत्रिमंडळात स्थान न देण्याचा निर्णय एकट्या अजित पवारांचा होता की जवळच्या सहका-यांशी चर्चा करुन त्यांनी तो निर्णय घेतला, याबद्दल अद्याप स्पष्टता नाही.