सेऊल : वृत्तसंस्था
सातत्याने कमी होत असलेली लोकसंख्या ही अनेक देशांमधील मोठी समस्या आहे. जन्मदर कमी झाल्याने दक्षिण कोरियामध्ये चिंतेचे वातावरण आहे. जन्मदर वाढावा यासाठी सरकार विविध उपाययोजना करीत आहे. सरकारने युवक-युवतींना प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेतला असून हे प्रोत्साहन केवळ शाब्दिक नसून त्यासाठी सरकार पैसे मोजणार आहे.
युवक-युवतींनी एकत्र यावे, डेटिंगवर जावे, विवाह करावा यासाठी सरकार आर्थिक मदत करणार आहे. यावरून तेथील सरकार किती गांभीर्याने ही पावले उचलत आहे याची कल्पना येते. सरकारने युवक-युवकांना प्रोत्साहन देण्यासाठी विविध उपक्रम हाती घेतले आहेत. तरुणांना डेटवर जाण्यासाठी सरकारने अनेक डेटिंग अॅप्सना सोयी-सवलती दिल्या आहेत. सरकारी यंत्रणांच्या माध्यमातून आणि डेटिंग इव्हेंट्सचेही आयोजन केले जात आहे.
डेटिंगसाठी आयोजित इव्हेंटमध्ये युवक-युवती एकमेकांना भेटतात आणि ओळख वाढवतात. ते एकमेकांना पसंत करू लागले आणि डेटवर जायचे ठरवले तर त्याचा खर्च देखील सरकार उचलते. सरकार डेटवर जाणा-या जोडप्याला ३४० डॉलर (सुमारे २८ हजार रुपये) खर्च करण्यासाठी देते. जर जोडप्याने लग्न करण्याचा निर्णय घेतला तर सरकार त्यांना १४ हजार डॉलर (सुमारे ११ लाख ६० हजार रुपये) रक्कम बक्षीस म्हणून देते. लग्न केलेल्यांना घर खरेदीसाठी अनुदान दिले जाते. गर्भधारणेशी संबंधित खर्च आणि परदेश प्रवासासाठी देखील पैसे सरकारकडून दिले जातात.