लातूर : प्रतिनिधी
मे १९२४ रोजी बार्शी (सोलापूर) येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मुंबई प्रांतिक बहिष्कृत हितकारणी परिषद घेतली होती. वास्तविक पाहता ती अत्यंत महत्वाची परिषद होती. परंतु, ही परिषद दुर्लक्षीत राहिलेली दिसून येते. एवढेच नव्हे तर ही परिषद कोणत्या तारखेला झाली, याचाही आजवर कुठे उल्लेख आलेला नव्हता. परंतु, बार्टीच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि तेरा परिषदा या अभ्यास गटात अभ्यास करताना या परिषदेच्या तारखेचा प्रत्यक्ष पुरावा सापडला आणि ती तारीख होती १० मे, अशी माहिती ज्येष्ठ विचारवंत डॉ. सुरेश वाघमारे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या संदर्भातील सविस्तर माहिती देताना डॉ. सुरेश वाघमारे म्हणाले, या परिषदेत डॉ. आंबेडकर यांनी केलेले भाषण मात्र मा. फ. गांजरे संपादीत डॉ. आंबेडकर भाषण खंड-७ तसेच डॉ. नरेंद्र जाधव यांनी प्रकाशित केलेल्या तीस-या भाषण खंडात तसेच महाराष्ट्र शासनाने प्रकाशित केलेल्या १८ व्या भाषण खंडात आणि बहुजन वृत्तपत्रात (११ डिसेंबर १९८३) हे भाषण प्रसिद्ध केलेले दिसून येते. दुसरी महत्वाची बाब म्हणजे ही सर्व भाषणे ज्ञानप्रकाश या वृत्तपत्रातून घेतल्याचा सर्वांनीच उल्लेख केला आहे. पण ही परिषद किती तारखेला झाली याचा त्यात उल्लेख नाही.
या परिषदेचा अभ्यास करताना या परिषदेच्या तारखेचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. या अनुषंगानेच या परिषदेचे अभ्यासक डॉ. टी. एम. मोरे, प्रा. डी. एस. मस्के(बार्शी), आंबेडकरी चळवळीचे अभ्यासक दत्ता गायकवाड, प्रा. एम. आर. कांबळे यांच्याशी चर्चा केली. यांना या परिषदेच्या तारखेची पुसटशी माहिती होती. पण, प्रत्यक्ष पुरावा त्यांच्याकडे नव्हता. तेव्हा या घटनेचा प्रत्यक्ष पुरावा घेण्यासाठी बार्टीचे बिराजे यांच्यासह शासकीय ग्रंथालय(पुणे), खैरमोडे कलेक्शन (मुंबई) येथे गेलो व मी स्वत: हैदराबाद येथील सेंंट्रल ग्रंथालयास भेट दिली. या ठिकाणी डॉ. आंबेडकर यांच्यावर पहिल्यांदा पीएच. डी. करणा-या एलिनार झोलिएट यांच्या पीएच. डी. शोध प्रबंध, तत्कालीन केसरी, विविध वृत्त, ज्ञानप्रकाश वृत्तपत्र पाहिली तेव्हा त्यात बार्शीच्या परिषदेत डॉ. आंबेडकर यांनी केलेले हस्तलिखीत भाषण, डॉ. आंबेडकर यांनी माटे यांना लिहिलेले पत्र व या परिषदेची १० मे ही तारीख प्रत्यक्ष पाहिली.
परंतु, १०० वर्षांनी आलेलया या यशाचे श्रेय हे केवळ माझ्या संशोधनाचे आहे, असे मी मानत नाही, तर याचे श्रेय बार्टी, बार्टीचे माजी महासंचालक धम्मज्योती गजभिये(ज्यांच्या काळात हा प्रकल्प सुरु झाला) तसेच हा प्रकल्प पुर्ण करण्यासाठी सर्व प्रकारचे सहकार्य करणारे बार्टीचे नूतन महासंचालक सुनील वारे, या प्रकल्पाशी संबंधीत असलेले अधिकारी, या अभ्यास गटातील सदस्य यांचा मोलाचा वाटा आहे. त्याच प्रमाणे या संशोधनाच्या अनुषंगाने ज्या उपरोक्त प्राध्यापकांशी चर्चा केली त्यांचाही यात वाटा आहे, असेही ज्येष्ठ विचारवंत डॉ. सुरेश वाघमारे म्हणाले.