नागपूर : मारवाडी फाउंडेशनतर्फे देण्यात येणारा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती पुरस्कार यंदा रिपाइंचे नेते व केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांना जाहीर करण्यात आला आहे. पाच लाख रुपये, शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
मारवाडी फाउंडेशनतर्फे दरवर्षी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार जनमानसात रुजविणा-या एका मान्यवराला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती पुरस्काराने सन्मानित केले जाते. केंद्रीय राज्यमंत्री आठवले यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना अनुसरून देशभरात वंचितांना न्याय देण्याचे मोठे कार्य केले आहे. बाबासाहेबांच्या विचारांनी प्रेरित होऊन ते देशभरात उपेक्षितांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे कार्य करीत आहेत, असे मारवाडी फाउंडेशनचे अध्यक्ष गिरीश गांधी यांनी म्हटले आहे.