लातूर : प्रतिनिधी
येथील श्री शिवाजी माध्यमिक व उच्य माध्यमिक विद्यालयातील मराठी भाषा विषयाचे अध्यापक डॉ. उमाकांत लक्ष्मणराव जाधव यांना शालेय शिक्षण विभागातर्फे शिक्षकांसाठी आयोजित केलेल्या दर्जेदार शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती स्पर्धेतील राज्यस्तरीय पुरस्कार शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदान करण्यात आला. डॉ. उमाकांत जाधव यांचा उच्च माध्यमिक भाषा विभागातून हा राज्यस्तरीय पुरस्कार देण्यात आला आहे.३० हजार रुपये, सन्मान चिन्ह व सन्मानपत्र, असे पुरस्काराचे स्वरुप आहे.
पुणे येथे राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या महात्मा फुले सभागृहात या राज्यस्तरीय सोहळयाचे आयोजन करण्यात आले होते. या समारंभात डॉ. उमाकांत जाधव यांना सन्मानित करण्यात आले. यावेळी शालेय शिक्षण विभाग प्रधान सचिव श्रीमती आय. ए. कुंदन, शिक्षण आयुक्त्त सुरज मांढरे, शिक्षण संचालक राहुल रेखावार, संपत सूर्यवंशी, महेश पालकर, आयटी विभागाचे सोनावणे, मुळये आदी उपस्थित होते. या प्रसंगी स्पर्धेतील डॉ. उमाकांत जाधव यांना राज्यस्तरीय पुरस्काराने गौरविण्यात आले.