लातूर : प्रतिनिधी
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे कार्य दलित, पीडित, शोषित, वंचित कष्टकरी कामगार, मजूर महिला, अशा सर्वांच्यासाठीच होते. या सर्वांच्या न्याय व हक्कासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सर्व समावेशक असलेले आदर्श भारतीय संविधान निर्माण केले. त्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आधुनिक भारताचे खरे महानायक ठरले आहेत, असे प्रतिपादन भिक्खु पय्यानंद थेरो यांनी या वेळी केले आहे. भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार, विश्वरत्न, बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंती निमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क येथे पंचरंगी धम्मध्वजारोहन व अभिवादन कार्यक्रम प्रसंगी भिक्खू पय्यानंद थेरो बोलत होते.
यावेळी शुभेच्छापर संदेश देताना भिक्खू पय्यानंद थेरो म्हणाले की, भारताच्या पावन भूमीवर अनेक थोर, कर्तुत्वान महापुरुषांनी जन्म घेऊन आपल्या देशासाठी व समाजासाठी अहोरात्र कार्य करून सामाजिक बांधिलकी व राष्ट्रनिष्ठा जोपासली आहे. त्यांच्या सेवेचा वारसा आजही आपल्या देशवासीयांसाठी आणि समाजासाठी आदर्श असून मार्गदर्शक व दिशादर्शक ठरलेला आहे. अशा या थोर महापुरुषांमध्ये आपले उद्धारकर्ते परमपूज्य भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव सर्वामध्ये अग्र आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणजे अद्वितीय अष्टपैलू व्यक्तिमत्व होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे भारतरत्न नव्हे तर विश्वभूषण ठरलेले आहेत. त्याचे कारण म्हणजे दीनदुबळे, विमुक्त, भटके, शोषित वंचित, अल्पसंख्याकाचे ते कैवारी आहेत.
या वेळी भंते बुद्धशील, भंते बोधिराज, केशव कांबळे, चंद्रकांत चिकटे, बसवंतप्पा उबाळे, बाबासाहेब गायकवाड, प्रा. अनंत लांडगे, सार्वजनिक जयंती समितीचे अध्यक्ष सुशीलकुमार चिकटे, अशोक कांबळे, विनोद खटके, अनिरुद्ध बनसोडे, उदय सोनवणे, ज्योतीराम लामतुरे, राहुल शाक्यमुनी, सूर्यकांत कालेकर, अॅड. रमक जोगदंड, भीमराव चौदंते, करण ओव्हाळ, मिलिंद धावारे, आशा चिकटे यांच्यासह महाविहार धम्मसेवक ग्रुपचे सर्व सदस्य उपस्थित होते.