लातूर : प्रतिनिधी
डॉ. एम. एस. स्वामीनाथन यांनी शेतक-यांच्या जीवनात हरितक्रांती बरोबर शाश्वत स्वावलंबन येण्यासाठी मौलिक योगदान दिले. ग्राम बीजोत्पादन, पारंपारिक शेती व आधुनिक तंत्रज्ञान याचा सुवर्णमध्य साधण्याचे कार्य जगभर केले. तसेच डॉ. स्वामीनाथन यांनी भारतीय शेतीला आकार देण्याचे महान कार्य केले. त्यांनी देशाच्या भूकमुक्तीचा ध्यास घेतला होता. शेतकरी बियाण्यांच्या बाबतीत स्वावलंबी असला पाहिजे, त्यासाठी ते जागरूक होते, असे प्रतिपादन डॉ. बाबासाहेब ठोंबरे यांनी केले.
वसंतराव नाईक कृषि विद्यापीठ, परभणी अंतर्गत कृषि महाविद्यालय, लातूर, कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा), जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी,लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित हरितक्रांतीचे जनक भारतरत्न डॉ. एम. एस. स्वामीनाथन यांच्या जन्मशताब्दी निमित्त शाश्वत शेती दिन कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून डॉ. साहेबराव दिवेकर, डॉ. व्यंकट जगताप, शिवसांब लाडके व दिपक सुपेकर यांची उपस्थिती होती. पुढे बोलताना डॉ. ठोंबरे म्हणाले की, कृषितील उत्पादन, उत्पादकता व निव्वळ उत्पन्न यात सातत्याने सकारात्मक वृद्धीसाठी धोरणकर्ते, शास्त्रज्ञ व प्रगतशील शेतकरी यांचा समन्वय महत्त्वाचा आहे.
डॉ. साहेबराव दिवेकर यांनी हवामान बदल अनुकूल शेती विकसित करणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले. यावेळी डॉ. विजय भामरे यांनी मित्र किडी, डॉ.वसंत सूर्यवंशी यांनी हाराकी तंत्रज्ञान तर डॉ. ज्योती देशमुख यांनी विद्यापीठातील तंत्रज्ञान शेतावरी या विषयावर मार्गदर्शन केले. यावेळी उपस्थित गणेश जगताप, दिपक मुंडे,अनुसया फड, संदिपान देशमुख, नामदेव चव्हाण, ज्ञानेश्वर कातळे, राम पाटील, शिवराज व्यवहारे,संतोष पाटील, हनुमंत शिंदे, बाळासाहेब कातळे व बालाजी भोसले या शेतक-यांना शेतीतील योगदानाबद्दल प्रतिनिधिक स्वरूपात प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिवसांब लाडके यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. वसंत सूर्यवंशी तर मनीषा बांगर यांनी उपस्थितांचे आभार मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. राजेश शेळके, मोहन गोजमगुंडे ,डॉ. दयानंद मोरे, डॉ. अनंत शिंदे, डॉ. प्रभाकर आडसूळ, डॉ. ज्ञानेश्वर सुरडकर, सचिन हिंदोळे, विशाल जगताप व रणजीत चव्हाण यांनी विशेष परिश्रम घेतले.