चाकूर तालुक्यातील रोहिणा शिवारात कारखाना; पाच आरोपी अटकेत
लातूर : प्रतिनिधी
राज्यात पसरलेल्या ड्रग्जच्या गोरखधंद्याचे लोन सोलापूर, तुळजापूर ते आता लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुक्यातील रोहिणा या खेड्यातील शिवारापर्यंत पोहोचले असून अमली पदार्थ नियंत्रण शाखा व पोलिसांनी सदरील ठिकाणी धाड टाकत ११.३६ किलो कच्चा माल जप्त केल्याने खळबळ उडाली. या प्रकरणी पाच जणांना अटक केली. त्यानंतर त्यांना न्यायालयासमोर हजर केले असता १५ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली.
मुंबईतील एका ड्रग्ज प्रकरणात अमली पदार्थ नियंत्रण शाखेचे पुणे येथील वरिष्ठ अधिकारी वृंदा जयंत सिन्हा व त्यांचे पथक एका संशयिताच्या शोधात चाकूर तालुक्यातील रोहिणा परिसरात गेले होते. सदर प्रकरणातील ५ आरोपींपैकी एकाचे मूळ गाव चाकूर तालुक्यातील असल्याची माहिती यंत्रणेकडे होती. दरम्यान, शेतातील एका शेडमध्ये ड्रग्जचा कच्चा माल आणून गुपचूप तो मिक्स करुन पुन्हा मुंबईकडे पोहोचविण्याचा इरादा असल्याचा अंदाज होता. तिथे धाड टाकल्यानंतर ११.३६ किलो कच्चा माल जप्त केला. पाच जणांना अटक करून बुधवारी न्यायालयासमोर हजर केले असता १५ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.
पाच आरोपींची सुरु होती चौकशी
अंमली पदार्थ नियंत्रण शाखेचे पुणे येथील पथक ड्रग्ज प्रकरणाच्या तपासासाठी चाकूर तालुक्यातील रोहीणा येथे आले होते. मुंबई (डोंगरी) येथील या आरोपी सोबतच चाकूर तालुक्यातील एक जण आणि अन्य तिघे, अशा एकूण पाच जणांची चौकशी सुरू आहे.
अपघातामुळे ड्रग्ज प्रकरणाचा उलगडा
ड्रग्जचा हा बाजार मुंबईतील असून, आरोपीही सध्या मुंबईतच वास्तव्याला आहेत. त्यातील एक जण मूळचा चाकूर तालुक्यातील असल्याने पुण्यातील पथक मागील आठवड्यात चौकशीसाठी जिल्ह्यात आले होते. यावेळी कारमध्ये आरोपी आहाद अल्ताब खान उर्फ आहद शफीक मेमन (२८, रा. डोंगरी ता. जि. मुंबई) होता. त्याला कलम ६४ एनडीपीसी अॅक्ट १९८५ अन्वये कारवाईसाठी पथकासोबत कारमधून घेऊन जात असताना त्याने कारची स्टेरिंग अचानकपणे उलटी फिरवून जाणीवपूर्वक दुखापत पोहचून जीवे मारण्याच्या उद्देशाने कार उलट्या दिशेने वळवली. त्यामुळे ही कार एका हॉटेलच्या बोर्डाला धडकावली. यात कारचे ६ लाख रुपयाचे नुकसान झाले असून कारमधील अधिकारी-कर्मचारी किरकोळ जखमी झाले. तसेच समोर उभी असलेल्या एका दुचाकीला धडक बसली. या प्रकरणी चाकूर पोलिसात वृंदा जयंत सिन्हा यांनी फिर्याद दिली. त्यावरुन आहाद मेमनविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला. या अपघातामुळे या घटनेचा उलगडा झाला.