23.3 C
Latur
Friday, November 15, 2024
Homeलातूरढगाळ वातावरणामुळे रब्बी उत्पादक शेतकरी धास्तावले

ढगाळ वातावरणामुळे रब्बी उत्पादक शेतकरी धास्तावले

देवणी : बाळू तिपराळे

देवणी तालुक्यात मागील चार दिवसापासून ढगाळ वातावरण तयार झाले आहे. शिवाय काही ठिकाणी तुरळक हलक्या पावसाच्या सरी बरसले आहेत. त्यामुळे फुलो-यात आलेल्या हरभरा, बडी ज्वारी, गहू पिकाला बदलत्या वातावरणाचा जबर फटका बसणार असल्याने, रब्बी उत्पादक शेतकरी धास्तावले आहेत. लागवडीसाठी केलेला खर्च देखील यावर्षी पदरात पडणार नसल्याची भीती शेतक-यांना आहे. अशा परिस्थितीत मात्र कृषी विभागाकडून कुठलेच मार्गदर्शन मिळत नसल्याची तक्रार शेतक-यांमधून केली जात आहे.

यंदा खरिपात पाऊसमान कमी झाल्याने कुठेही जलसाठ्यात वाढ झाली नाही. परिणामी विहिरीतील जलपातळी देखील वाढली नसल्याने शेतक-यांनी यंदा रब्बीच्या पे-यात दुपटीने घट केली. ज्या शेतक-यांकडे थोडेफार सिंचनाची सोय होती अशाच शेतक-यांनी कमी पाण्यात रब्बी पिक येईल म्हणून सुरुवातीला जवळजवळ १५, १४८. हजार हेक्टरवर पिकांची पेरणी केली. पेरणीनंतर शेतक-यांनी कसेबसे रब्बी पिकाला पाणी देत उगवून देखील आणले. परंतु नोव्हेंबर व डिसेंबर महिन्यात सलग चार ते पाच दिवस जोरदार पाऊस झाल्याने शेतक-यांचे शेकडे हेक्टर रब्बी पिकांचे नुकसान झाले.

शेतात पाणी साचलेल्या ठिकाणी हरभरा पिक जळून गेले. तरीही या संकटातून सावरत शेतक-यांनी उमेद नहरता महागडी औषधी फवारणी करीत हरभरा पिक हातात आणले. तर ब-याच शेतक-यांनी हरभरा पिकांची शेकडो हेक्टरवर दुबार पेरणी केली. अवकाळी पावसामुळे विहिरीतील पाणी पातळीत थोडीफार वाढ झाल्याने, रब्बीत वाढ झाली. परंतु सध्या सदर हरभरा पिके फुलो-यात असताना, मागील चार दिवसापासून अचानक ढगाळ वातावरण तयार झाल्याने हरभरा उत्पादक शेतकरी धास्तावले आहेत. बदलते वातावरण हरभरा पिकासाठी घातक असल्याचे शेतकरी सांगत आहेत. अवकळीच्या तडक यातून बाहेर पडलेल्या शेतक-यसाा आता पुन्हा ढगाळ वातावरणाचा सामना करावा लागत असल्याने शेतक-यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. अशा बिकट परिस्थितीत कृषी खात्याने शेतक-यांना मार्गदर्शन करणे गरजेचे असताना कृषी खात्याने याकडे दुर्लक्ष केले आहे. परिणामी शेतक-यांंमधून संताप व्यक्त केला जात आहे.

तर हाती काहीच लागणार नाही.
नोव्हेंबर महिन्यात अवकाळी पावसाने हजेरी लावीत हजारो हेक्टर वरील हरभरा पिकाचे नुकसान केले. त्यामुळे हरभरा उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले. त्यातच आता अनेक भागात हरभरा पिक फुलो-याच्या अवस्थेत आहे. तर काही ठिकाणी घाटे लागले आहेत. मात्र अशा परिस्थितीत ढगाळ वातावरण तयार झाल्याने हरभरा पिकाला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे हरभरा उत्पादक शेतकरी चिंतातूर झाले आहेत. अशा वातावरणात अवकाळी पाऊस झाला तर हाती काहीच लागणार नसल्याचे शेतकरी सांगत आहेत. संकटाची मालिका शेतक-यांची पाठ सोडायला तयार नसल्याने शेतकरी रडकुंडीला आले आहेत. यावर्षी अपेक्षित उत्पादन हरभरा पिकातून शेतक-यांना मिळणार नसल्याचे वास्तव आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR