ढोकी : प्रतिनिधी
धाराशिव तालुक्यातील ढोकी येथील दत्तनगर-राजेशनगर या भागात दोन गटांत झालेल्या वादाचे पर्यवसान जोरदार हाणामारी आणि दगडफेकीत झाले. दोन्ही बाजूंनी झालेल्या दगडफेकीमुळे लातूर-बार्शी मुख्य रस्त्यावर दगडांचा खच पडला. काही वाहनांचे व दुकानांचे नुकसान झाले. या घटनेत पाच जण जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी धाराशिव येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले.
रविवारी रात्री आठच्या सुमारास दत्तनगर आणि राजेशनगर परिसरात पारधी समाजातील दोन गटांमध्ये काही कारणातून वाद सुरू झाला. सुरुवातीला बाचाबाचीचे रूपांतर हाणामारीत झाले. त्यानंतर दोन्ही गटांकडून एकमेकांवर दगडफेक सुरू झाली. अचानक झालेल्या दगडफेकीमुळे परिसरात मोठी धावपळ उडाली.
दगडफेकीचा परिणाम लातूर-बार्शी रस्त्यावर दगडांचा खच पडल्याने नहाक,ईतर नागरिकांना व वाहतुकीवर परिणाम झाला. काही वाहनांचे नुकसान झाले, तर भयभीत झालेल्या व्यापाऱ्यांनी दुकाने बंद केली.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास हजारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला. परिस्थिती अधिक चिघळू नये यां याची काळजी स्थानिक राजकीय नेत्यांनी पण घेतली.
या हाणामारीत बाबासाहेब चव्हाण, तोळाबाई चव्हाण, राजेंद्र चव्हाण, आनंदा पवार आणि आप्पा पवार हे पाच जण जखमी झाले. त्यांच्यावर ढोकी प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी धाराशिव जिल्हा शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले.
५० ते ६० युवक पोलिस ठाण्यात
घटनेनंतर दत्तनगर- राजेशनगर परिसरातील सुमारे ५० ते ६० युवक पोलिस ठाण्यात दाखल झाले. पुन्हा अनुचित प्रकार घडू नये, यासाठी परिसरात पोलिस बंदोबस्त वाढविण्याची मागणी करण्यात आली.रात्री उशिरापर्यंत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल गुन्हा दाखल करण्यात आले.
















