निलंगा : प्रतिनिधी
लातूर-जहीराबाद राष्ट्रीय महामार्गावरील तगरखेडा मोडपासून तगरखेडा ते हालसी ( तु. ) जाणा-या रस्त्याचे डांबरीकरणाचे काम मंजुरी असूनही संबंधित गुत्तेदार काम सुरू करीत नसल्याने वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण होत आहे. सदर मंजुरी असलेले डांबरीकरणाचे काम तात्काळ करण्यात यावे अन्यथा दि २० एप्रिल रोजी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येणार असल्याचा इशारा तगरखेडचे उपसरपंच मदन बिरादार यांच्या नेतृत्वाखाली सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांना देण्यात आलेल्या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
लातूर जहीराबाद राष्ट्रीय महामार्गावरील तगरखेडा मोडपासून तगरखेडा ते हालसी ( तु ) रस्त्याच्या डांबरीकरणाच्या कामास मंजुरी आहे मात्र संबंधित ठेकेदार काम करीत नसल्याने या रस्त्यावरून नागरिकांना ये-जा करण्यास व वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण होत आहे. विशेष म्हणजे पावसाळ्यामध्ये या रस्त्यावरील ओढ्यावरील रस्ता वाहून गेला आहे त्यामुळे येथून वाहतूक करणे, शालेय विद्यार्थ्यांना ये-जार करणे व यांत्रिक वाहतूक करणे जिकिरीचे झाले आहे.
पावसाळ्याचे दिवस जवळ येत आहेत व सदर काम डांबरीकरणाचे असल्याने हे काम पावसाळ्यात दर्जाचे होणार नाही म्हणून संबंधित कंत्राटदारास प्रशासनाकडून हे काम लवकर करण्यात यावे अन्यथा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर तगरखेडा व हलसी गावातील नागरिक आमरण बसणार असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. या निवेदनावर तगरखेडचे उपसरपंच तथा निलंगा युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मदन बिरादार , रंजीत सूर्यवंशी , नागेश राघू , गणेश शेटगार, शेकर बिरादार, आनंद पाटील, प्रशांत बिरादार , हुसेन सैय्यद, शिवचैतन्य बिरादार यांच्या स्वाक्ष-या आहेत.