मुंबई : प्रतिनिधी
मागील आठवड्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा रायगड दौ-यावर होते. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुण्यतिथीदिनाचा कार्यक्रम शहांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पार पडला. यानंतर त्यांनी खासदार सुनील तटकरे यांच्या घरी स्नेहभोजन केले होते. याच स्नेहभोजनासाठी सरकारी तिजोरीतून तब्बल दीड कोटी रुपयांचा खर्च झाल्याचा धक्कादायक आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला आहे. त्यांनी ट्विट करून याबाबतची माहिती दिली.
अंजली दमानिया ट्विट करत म्हणाल्या, जनतेने कष्टाने कमवलेल्या कराच्या पैशातून तटकरेंसाठी खास हॅलिपॅड? ती पण चार-चार. अमित शहा यांची भेट वैयक्तिक होती. तो भार सरकारी तिजोरीवर कशासाठी? अमित शहा यांना जेवायला घालायचंय, खुशाल घाला. सोन्याच्या ताटात घालायचंय तरी घाला. ते आमच्या कष्टाच्या पैशाने कशासाठी? तटकरेंच्या अफाट कंपन्या आहेत ना? मग त्यांनी वैयक्तिक खर्च करावा. देवेंद्र फडणवीस यांचे पुनश्च अभिनंदन. सिंचन घोटाळा विसरून नवीन सरकारमध्ये खूपच चांगला ताळमेळ जाणवतोय, असा खोचक टोलाही त्यांनी लगावला.
अमित शहांच्या दौ-याला चार हेलिपॅड
अमित शहा हे रायगडवरील कार्यक्रम आटोपून तटकरे यांच्या सुतारवाडीतील घरी जेवणासाठी गेले. जाताना रायगडावरून २० किलोमीटर असलेल्या सुतारवाडीत ते हेलिकॉप्टरने उतरले. हेच हेलिकॉप्टर उतरविण्यासाठी ४ युनिटचे हेलिपॅड तयार करण्यात आल्याचा आरोप दमानिया यांनी केला आहे. यासाठी ७ एप्रिल रोजी १ कोटी ३९ लाख रुपयांचे टेंडरही काढले होते. एका वर्तमानपत्रात ९ एप्रिल रोजी हे टेंडर छापूनही आले होते, असे त्यांनी सांगितले.
सुनील तटकरेंनी केला होता पाहुणचार
अमित शहा यांच्या स्नेहभोजनात तटकरे यांनी फक्कड कोकणी बेत आखला होता. शहा हे शाकाहारी असल्याने ते मासे खात नाहीत. पण हापूस आंब्याचा सिझन असल्याने त्यांच्यासाठी आमरस-पुरीचे नियोजन करण्यात आले होते. याशिवाय मिसळपाव, मोदक आणि साबुदाणा वड्याचा पाहुणचार होता. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार आणि अन्य मंत्र्यांसाठी खास माशांचा आणि मटणाचा पाहुणचार होता. जेवण झाल्यानंतर सोलकढीही केली होती.