लातूर : प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे दि. २२ फेब्रुवारी रोजी राजकयी कार्यक्रमानिमित्ताने लातूर येथे आले होते. कार्यक्रमस्थळी जाण्याअगोदर मराठा कार्यकर्त्यांनी दुपारी त्यांना काळे झेंडे दाखवून निदर्शने केली. यावेळी त्यांच्या समवेत राज्याचे क्रीडा मंत्री संजय बनसोडे, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर याही होत्या.
राष्ट्रवादी राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) वतीने गुरुवारी लातूर शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. लातूरच्या अंबाजोगाई रोडवरील हॉटेल अतिथी येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, क्रीडा मंत्री संजय बनसोडे, रुपाली चाकणकर यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यासाठी तटकरे, बनसोडे, चाकणकर यांच्या गाड्यांचा ताफा हॉटेल अतिथीकडे जात असताना अचानक मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी गाड्यांसमोर येत त्यांना काळे झेंडे दाखवले. त्यांच्या निषेधाच्या घोषणाही दिल्या. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी आठ आंदोलक कार्यकर्त्यांना ताब्यात घेतल्याचे सांगण्यात आले. दरम्यान तटकरे, बनसोडे आदींच्या विविध कार्यक्रमांच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला होता.