38.3 C
Latur
Monday, April 7, 2025
Homeमहाराष्ट्रतनिषा भिसेंचा रुग्णालयात मानसिक छळ?

तनिषा भिसेंचा रुग्णालयात मानसिक छळ?

पुणे : पुणे शहरातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर गंभीर आरोप झाले आहेत. भाजपचे आमदार अमित गोरखे यांचे पीए असलेले सुशांत भिसे यांच्या पत्नी तनिषा सुशांत भिसे यांचा गुरुवारी मृत्यू झाला. या प्रकरणास रुग्णालय जबाबदार असल्याचा आरोप होऊ लागल्यानंतर रुग्णालयाने चौकशी समिती नेमली. या समितीचा अहवाल समोर आल्यानंतर भिसे कुटुंबीयांनी हॉस्पिटलकडून तनिषा भिसे यांचा मानसिक छळ करण्यात आला अशी प्रतिक्रिया दिली आहे.

तनिषा भिसे प्रकरणावर प्रतिक्रिया देताना कुटुंबातील सदस्य म्हणाले की, ‘डॉक्टर धनंजय केळकर यांनी पत्राच्या माध्यमातून मांडलेले मुद्दे साफ खोटे आहेत. आम्ही डॉक्टरांना सांगूनच हॉस्पिटलच्या बाहेर पडलो होतो. यासाठी हॉस्पिटलचे सीसीटीव्ही फुटेज खुले करा. सीसीटीव्ही फुटेज माध्यमांना द्या, म्हणजे सत्य समोर येईल. तनिषा भिसे यांच्या आजाराबाबत खाजगी बाबी हॉस्पिटलने सार्वजनिक करायला नको होत्या. ते कायद्याने गुन्हा आहे याबाबत आम्ही कायदेशीर सल्ला घेऊन कारवाई करणार.’

पुढे त्यांनी हॉस्पिटलने आमच्यासोबत चर्चा करायला हवी होती असे म्हटले आहे. ‘डॉ. सुश्रुत घैसास यांचे नातेवाईक मानसी घैसास यांच्याकडे आम्ही आयबीएफ केले नसल्याचा राग डॉ. सुश्रुत घैसास यांना आला होता. सोशल मीडियाच्या माध्यमातून याला जातीय रंग देण्याचा प्रयत्न केला जात आहे, हे चुकीचे आहे. मानवतेच्या दृष्टिकोनातून विचार करावा. हॉस्पिटलने पत्र काढण्याऐवजी समोरासमोर बसून चर्चा करावी. त्यादिवशी आम्ही हॉस्पिटलमध्ये जवळपास पाच ते साडेपाच तास होतो, हॉस्पिटलकडून तनिषा भिसे यांचा मानसिक छळ करण्यात आला, असे ते म्हणाले.
काय आहे चौकशी अहवालात..

दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने नेमलेल्या चौकशी समितीने चार मुद्यांवर भर दिला आहे. समितीने म्हटले की, महिला रुग्णासाठी सात महिन्यांच्या जुळ्या मुलांची प्रसुती धोकादायक होती. त्याची कल्पना देण्यात आली होती. जुळी मुले असूनही महिला सहा महिने तपासणीसाठी आली नव्हती. अगाऊ रक्कम मागितल्याच्या रागातून रुग्णाच्या नातेवाईकांनी तक्रार केली. रुग्णास दहा ते वीस लाख खर्च येईल, बाळांना दोन-अडीच महिने रुग्णालयात ठेवावे लागेल, तुम्हाला जमेल तेवढे पैसे भरून दाखल व्हा, असे सांगितल्याचे समितीने म्हटले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR