पुणे : वृत्तसंस्था
पुण्यातील प्रसिद्ध दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर रुग्णांच्या जीवापेक्षा पैशांना प्राधान्य दिल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. २९ मार्च रोजी झालेल्या या दुर्दैवी घटनेत तनिषा भिसे (वय २७) या सात महिन्यांच्या गर्भवती महिलेचा उपचाराअभावी मृत्यू झाला. त्यानंतर राज्यभरातून संताप व्यक्त केला जात आहे.
राज्य महिला आयोगाने या प्रकरणाची दखल घेतली होती. आज प्रत्यक्ष महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी भिसे यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली आहे. त्यानंतर रुग्णालयाला समज देणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच रुग्णालय दोषी असून कारवाई होणार असल्याचेही त्यांनी सांगितले होते. या गर्भवती महिलेच्या मृत्यूप्रकरणी डॉ. घैसास यांनी राजीनामा दिल्याची माहिती समोर आली आहे.
पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील डॉ. सुश्रुत घैसास यांनी राजीनामा दिला आहे. हॉस्पिटल प्रशासनाची होणारी बदनामी आणि रुग्णांची होणारी गैरसोय पाहता सुश्रुत घैसास यांचा राजीनामा घेण्यात आला आहे. घैसास यांचा राजीनामा दीनानाथ रुग्णालय प्रशासनाला सुपूर्द करण्यात आला आहे. डॉ. घैसास यांनी तनिषा भिसे प्रकरणात उपचारासाठी अमानत रक्कमेची मागणी केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला होता.
डॉ. सुश्रुत घैसास यांनी तनिषा भिसे यांच्या कुटुंबियांकडून १० ते २० लाख मागितल्याचा गंभीर आरोप करण्यात आला होता. आम्ही ३ लाख भरायला तयार होतो. असेही कुटुंबीयांनी सांगितले होते. मात्र रुग्णालयाने ते ऐकले नाही. त्यामुळे महिलेला घेऊन दुस-या हॉस्पिटलमध्ये जावे लागले. त्याठिकाणी महिलेचा जीव गेला. या प्रकरणावरून घैसास यांच्यावर टीका होऊ लागली होती. तसेच त्यांना अटक करावी, त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणीही सर्वत्र होऊ लागली होती. आता तर रुग्णालय दोषी असल्याचे पुरावे समोर आले आहेत. अशातच घैसास यांच्यामुळे ते आणखी अडचणीत येण्याची शक्यता आहे. हॉस्पिटल प्रशासनाची होणारी बदनामी आणि रुग्णांची होणारी गैरसोय पाहता त्यांचा राजीनामा घेण्यात आला आहे.