21.3 C
Latur
Thursday, November 14, 2024
Homeअंतरराष्ट्रीयतब्बल २,५०० कॅरेटचा तळहाताएवढा हिरा !

तब्बल २,५०० कॅरेटचा तळहाताएवढा हिरा !

 

गाबोरोने : वृत्तसंस्था

बोत्सवाना येथील एका खाणीतून तब्बल २,४९२ कॅरेटचा हिरा काढण्यात आला आहे. हा जगातील दुसरा सर्वात मोठा नैसर्गिक हिरा आहे. कॅनडाच्या लुकारा डायमंड कॉर्प या कंपनीने कारोवे येथील खाणीतून हा हिरा उत्खनन करुन काढला.

कंपनीने एका निवेदनातून याबाबत माहिती दिली. विशेष म्हणजे, एक्स-रे तंत्रज्ञानाने हा हिरा शोधण्यात आला आहे. गेल्या १०० वर्षांत आढळलेला हा सर्वात मोठा हिरा ठरला आहे. कंपनीने या हि-याचा दर्जा आणि किमतीबाबत कोणताही खुलासा केलेला नाही. बोत्सवाना हा जगातील दुसरा सर्वात मोठा हिरा उत्पादक देश आहे. अलिकडच्या काळातील सर्वच सर्वात मोठे हिरे याच देशात सापडले आहेत.

– १,७५८ कॅरेटचा ‘सेवेलो’ हा हिरा याच खाणीत २०१९ मध्ये सापडला होता. तो आतापर्यंतचा दुसरा सर्वात मोठा हिरा मानला गेला होता. फ्रान्सच्या लुईस वुईटन या कंपनीने तो खरेदी केला होता.

– १,१११ कॅरेटचा ‘लेसेदी ला रोना’ हा हिरा देखील याच खाणीतून काढण्यात आला होता. एका ब्रिटीश सराफ व्यावसायिकाने तो ५.३ कोटी डॉलरला २०१७ मध्ये खरेदी केला होता.

– १९०५ मध्ये दक्षिण आफ्रिकेतील एका खाणीतून ३,१०६ कॅरेटचा हिरा काढण्यात आला होता. त्या हि-याचे नाव कलिनन असे होते. त्याचे अनेक तुकडे करण्यात आले होते. त्यांचे पैलू पाडून ते हिरे ब्रिटीश शाही दागिन्यांमध्ये लावण्यात आलेले आहेत.

काळ्या हि-याचे आकर्षण
ब्राझीलमध्ये १८००च्या दशकात एक मोठा काळा हिरा सापडला होता. मात्र, तो पृथ्वीच्या पृष्ठभागावर सापडला होता आणि तो एखाद्या उल्केचा भाग असावा, असे त्यावेळी म्हटले गेले होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR