16.5 C
Latur
Monday, November 25, 2024
Homeसंपादकीयतयारी जोमात, घोषणेची प्रतीक्षा!

तयारी जोमात, घोषणेची प्रतीक्षा!

आताशा महाराष्ट्रात प्रत्येक सण, उत्सव हा धार्मिक वा पारंपरिक कमी आणि राजकीय रंगात जास्त बुडालेला दिसतो. लोकशाही व्यवस्थेतील राजकारणाचे हे सर्वव्यापी रूप, त्यामुळे त्याबद्दल आताशा कुणाला काही गैर वाटेनासे झाले आहे. एकदा जनतेनेच राजकारणाचे हे सर्वव्यापी रूप मनोभावे स्वीकारल्यावर राजकीय पक्ष व नेते त्याचा लाभ उठविण्यापासून दूर का राहतील? त्यामुळेच जयंती, पुण्यतिथी, इफ्तार पार्टी, दहीहंडी, गणेशोत्सव, नवरात्र महोत्सव, दसरा, दिवाळी, गुढी पाडवा असे काही म्हणजे काहीच राजकारणाच्या सर्वव्यापी रूपापासून अलिप्त राहिलेले नाही. म्हणूनच हल्ली नेतेमंडळी गल्लोगल्लीच्या सार्वजनिक गणेश मंडळांच्या, नवरात्रोत्सव मंडळांच्या आरत्यांमध्ये आपल्या चेल्याचपाट्यांसह आवर्जून आरतीचे ताट घेऊन उभे असलेले दिसतात. शिवाय उत्सवाच्या दिवसांत जास्तीत जास्त मंडळांच्या आरत्या करण्याची स्पर्धा नेतेमंडळीमध्ये लागलेली दिसते.

यात आता श्रद्धेचे, परंपरांचे पाईक होण्याचा भाग किती आणि राजकीय स्वार्थ किती, हे न कळण्या इतपत जनता दुधखुळी निश्चितच राहिलेली नाही. असो! लोकशाही व्यवस्थेने प्रत्येकाला धर्माचरणाचा अधिकार बहाल केलेला असल्याने त्यावर आक्षेप असण्याचे कारण नाहीच. मूळ मुद्दा राजकारणाच्या सर्वव्यापीपणाचा! त्याचा प्रत्यय जनतेला इतरवेळी येतोच पण निवडणुकीच्या तोंडावर तर जास्त प्रकर्षाने येतो. तसंही मागच्या काही वर्षांपासून दसरा मेळाव्यांद्वारे आपल्या राजकीय विचारांचे सोने लुटण्याची परंपरा महाराष्ट्रात रुजली आहेच. यावर्षीच्या दस-यापासून आपल्या शताब्दी वर्षात पदार्पण करत असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने दसरा मेळाव्याचे म्हणजे खरं तर संचलनाची पण नंतर मेळाव्याचे रूप धारण करण्याची परंपरा सुरू केली.

ती ३० ऑक्टोबर १९६६ रोजी बाळासाहेब ठाकरे यांनी मुंबईत शिवतीर्थावर म्हणजे शिवाजी पार्कवर आणली. मग स्व. गोपीनाथ मुंडे यांनी या परंपरेचा आणखी विस्तार करून ती भगवान गडावर आणली. दरम्यान, राज ठाकरे शिवसेनेतून बाहेर पडल्यावर त्यांनी आपल्या मनसैनिकांसाठी विचारांचे सोने लुटण्याची परंपरा सुरू केली. अडीच वर्षांपूर्वी शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर तर मुंबईत शिवसेनेच्या दोन्ही गटांचे दसरा मेळावे व त्याद्वारे शक्तिप्रदर्शन आणि एकमेकांवरची यथेच्छ राजकीय चिखलफेक सुरू झाली. त्यात यावर्षी मराठा आरक्षणासाठी लढा उभारणारे मनोज जरांगे यांनी नारायण गडावर आयोजित केलेल्या मेळाव्याची भर पडली. राज ठाकरे यांनी यावर्षी थेट मेळावा न घेता पॉडकास्टद्वारे विचारांचे सोने लुटण्याचा मार्ग स्वीकारला. या सर्व मेळाव्यांमधील नेत्यांची भाषणे ऐकली तर एकच निष्कर्ष निघतो आणि तो म्हणजे राज्यातले सर्वजण आगामी विधानसभा निवडणुकीसाठी पूर्णपणे सज्ज आहेत व निवडणूक आयोग निवडणुकीची घोषणा कधी करतो याच्याच प्रतीक्षेत आहेत.

तसंही हरियाणा व जम्मू-काश्मीरच्या निवडणुकांचा निकाल जाहीर झाल्यावर दोन-चार दिवसांत महाराष्ट्राच्या निवडणुकीची घोषणा होईल हाच सत्ताधारी व विरोधकांचाही अंदाज होताच. त्यामुळे दसरा मेळाव्यांच्या निमित्ताने प्रचाराचा नारळ वाढविण्याची संधी कोण सोडणार? त्यामुळे यावर्षीचे दसरा मेळावे विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ करणारे असणार हे अपेक्षितच होते आणि दस-याच्या निमित्ताने राज्यात झालेल्या पाचही मोठ्या मेळाव्यांनी, त्यातला एक राज ठाकरेंचा, ज्याला तांत्रिकदृष्ट्या मेळावा संबोधता येणार नाही पण मूळ हेतू तोच, जनतेची अपेक्षा पुरेपूर पूर्ण केली. शिवतीर्थावरच्या दसरा मेळाव्यात शिंदे सेनेची यथेच्छ लक्तरे काढतानाच उद्धव ठाकरे यांनी थेट दोन महिन्यांत आपले सरकार येणार आहे व त्यानंतर आपण महायुती सरकारचा हिशेब पुरता चुकता करणार, असे जाहीरच करून टाकले.

मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर करा, या उद्धव ठाकरेंच्या मागणीला महाविकास आघाडीतील उर्वरित दोन प्रमुख मित्रपक्षांनी म्हणजे काँग्रेस व शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांनी फारसा प्रतिसाद दिलेला नसतानाही दसरा मेळाव्यातून पुढचा मुख्यमंत्री मीच असे संकेत उद्धव ठाकरे यांनी देऊन टाकले. महायुतीपेक्षा महाविकास आघाडीसाठी हे जास्त धक्कादायक आहे. त्यावर आता काय प्रतिक्रिया उमटतात हे पहावे लागेल. इकडे एकनाथ शिंदे यांनीही उद्धव ठाकरेंना थेट आव्हान देताना आपल्याच हाती महायुतीचे सुकाणू असल्याचे अप्रत्यक्ष संकेत देऊन टाकले. राज ठाकरेंनी वेड्यावाकड्या युती, आघाडी कारणा-यांचा व मतदारांच्या मतांचा अनादर करणा-यांचा वचपा काढा असे आवाहन करतानाच मतदारांना आपल्या हाती महाराष्ट्र सोपविण्याची गळ घातली. थोडक्यात त्यांनीही आपली मुख्यमंत्रिपदाची मनीषा जाहीर केली. जरांगे पाटील व पंकजा मुंडे यांच्या मेळाव्यात वैयक्तिक महत्त्वाकांक्षांचे संकेत नव्हते मात्र येत्या निवडणुकीत मराठा विरुद्ध ओबीसी हा सामना रंगणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळाले.

एकंदर काय तर या दसरा मेळाव्यांद्वारे प्रत्येकाने आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आपण दंड थोपटून तयार असल्याचेच स्पष्ट केले. यात भाजपची मातृसंस्था रा. स्व. संघही मागे कसा राहील. सरसंघचालक मोहन भागवत यांनी बांगलादेशातील घटनांचा संदर्भ देत हिंदू ऐक्य किती महत्त्वाचे आहे, हे सांगितले. जात, भाषा, प्रांत या गोष्टींमध्ये अडकू नका. याने हिंदू समाज दुर्बल होतोय. सर्व हिंदूंनी एकत्र येऊन सशक्त व्हावे, असे आवाहन मोहन भागवत यांनी केले. त्यांच्या या आवाहनामागे भाजपला लागलेली हिंदू व्होट बँकेच्या विभाजनाची काळजीच आहे, हे स्पष्टच आहे. एकंदर दसरा मेळाव्यांनी विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले गेले आहे व आता प्रतीक्षा फक्त निवडणूक आयोगाच्या अधिकृत घोषणेचीच आहे, हे स्पष्टच! त्यामुळे मायबाप मतदारांनीही आता मताचे सोने कुणाला वाटायचे याचा विचार पक्का करायला हवा, हे मात्र निश्चित!

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR