पिंपळनेर : डॉ. गौरी पालवे-गर्जे यांच्या आत्महत्या प्रकरणाने राज्यात सध्या खळबळ उडालेली आहे. डॉ. गौरी पालवे यांचा पती अनंत गर्जे हा मंत्री पंकजा मुंडे यांचा पीए होता. गौरी गर्जे यांना अनंत गर्जे मारझोड करायचा, असा दावा केला जात आहे. सोबतच आमच्या मुलीने आत्महत्या केलेली नाही. तिची हत्या करण्यात आली आहे, असा दावा गौरी गर्जे यांच्या कुटुंबीयांनी केला आहे.
अनंत गर्जे सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे. दरम्यान, ही घटना घडल्यानंतर आता पंकजा मुंडे यांनी गौरी गर्जे यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली आहे. सोबतच यातून कोणीही सुटणार नाही. अनंत गर्जे याने गुन्हा केला असेल तर त्याला शिक्षा होणारच, असे पंकजा मुंडे म्हणाल्या सोबतच मला याबाबत काहीही माहिती नाही. मला कल्पना असती तर मी अनंतच्या दोन कानाखाली लावल्या असत्या असेही पंकजा मुंडे म्हणाल्या.
गौरीने आत्महत्या केली नसून तिची हत्या झाली आहे असा आरोप तिचे वडील अशोक पालवे आणि आई अलकनंदा पालवे यांनी केला आहे. या घटनेनंतर मंत्री पंकजा मुंडे या गौरी गर्जे हिच्या माहेरच्या कुटुंबीयांची भेट घेतली. त्यासाठी पंकजा मुंडे बीडच्या शिरूर कासार तालुक्यातील पिंपळनेर या गावात दाखल गेल्या होत्या. पंकजा मुंडे यांच्या या भेटीदरम्यान गौरी पालवे यांच्या कुटुंबीयांनी त्यांची व्यथा मांडली. सोबतच आम्हाला न्याय द्यावा, अशी मागणी केली. मंत्री पंकजा मुंडे यांना पाहताच गौरी गर्जे यांचे वडील अशोक पालवे यांनी टाहो फोडला. त्यानंतर मंत्री पंकजा मुंडेदेखील भावुक झाल्याचे पाहायला मिळाले.
मी कोणालाही फोन केलेला नाही : मुंडे
गौरी गर्जे यांना होणार त्रास आणि त्यांची आत्महत्या यावर बोलताना, मला गौरीच्या त्रासाबद्दल माहितीच नाही. नाहीतर मी अनंत गर्जेच्या दोन कानाखाली लावल्या असत्या. भगवान बाबा आणि मुंडे साहेबांची शपथ घेऊन सांगते की मी या प्रकरणात कोणालाही फोन केलेला नाही. सोबतच कोणालाही वाचवण्याचा प्रयत्न केला नाही. माझ्याकडे दहा पीए आहेत. पगारी नोकरांच्या घरात काय चालले हे कसे माहिती होईल. हे असे काही आहे ते नंतर मला समजले असे स्षष्टीकरण यावेळी पंकजा मुंडे यांनी दिले.
नेमके काय होणार?
या गुन्ह्यातून कोणीही वाचणार नाही. या प्रकरणाचा योग्य तपास झाला पाहिजे. अनंत गर्जे हा माझा पीए होता. त्यात माझा काय दोष, अशा भावनाही यावेळी पंकजा मुंडे यांनी व्यक्त केल्या. दरम्यान, सध्या पोलिस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत. त्यामुळे नेमके काय होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

