लातूर : प्रतिनिधी
मागील तीन ते चार वर्षापासून सातत्याने निवेदने, धरणे आंदोलने, निदर्शने तसेच अनेक वेळा संप करुनसुद्धा आवश्यक तितक्या प्रमाणात बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये सर्व संवर्गात नोकर भरती होत नाही. बँक ऑफ महाराष्ट्रचे वरिष्ठ व्यवस्थापन अहंकारयुक्त दर्पाने आंधळे, मुके आणि बहिरे झाले आहे. यांना बँकेच्या उच्च परंपरा, बँकेचे मालक असलेली जनता आणि ग्राहकांचे होणारे हाल, अपु-या कर्मचारी अधिकारी वर्गामुळे त्यांच्यावरील तणाव याकडे मुजोरपने दुर्लक्ष देवून आपल्याच मस्तीत वागत आहे.
त्यामुळे या पुढील काळात महाराष्ट्र बँकेतील संघटनेस बेमुदत संप सुद्धा करावा लागला तर त्यास जबाबदार बँकेचे चेअरमन आणि वरिष्ठ व्यवस्थापन जबाबदार असेल, असा इशारा महाबँक कर्मचा-यांचे राष्ट्रीय नेते कॉ. धनंजय कुलकर्णी यांनी दिला. गुरुवारी या बँकेत एक दिवसाचा इशारा संप लातूर शहरात कर्मचा-यांनी निदर्शने करून पूर्ण यशस्वी केला. त्यावेळी निदर्शक बँक कर्मचा-यापुढे कॉ. धनंजय कुलकर्णी बोलत होते. पुढे बोलताना त्यांनी बँकेच्या व्यवस्थापनाला खडे बोल सूनावले. यावेळी कॉ. उत्तम होळीकर यांनी उत्तम ग्राहक सेवेसाठी नोकर भरती या प्रमुख मागणीसाठी करीत असलेल्या बँक ऑफ महाराष्ट्रमधील या संपास ग्राहकांनी पाठिंबा द्यावा, असे आवाहन केले. यावेळी कॉ. दीपक माने यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी बँकेच्या मिनी मार्केट येथील लातूर मुख्य शाखे समोर जमून जिल्हाभरातील ५० ते ६० कर्मचा-यांनी हातात मागणी फलक घेऊन व मुजोर व्यवस्थापनाचे विरोधात घोषणा देऊन दणदणीत संप साजरा केला. यावेळी कर्मचा-यांचे नेते कॉ. महेश घोडके, कॉ. उदय मोरे, कॉ. प्रकाश जोशी, कॉ. बालाजी मुळजे, महिला कर्मचारी नेत्या कॉ. रेश्मा भवरे, कॉ. संजीवनी गोजमगुंडे, कॉ.ऐश्वर्या उदावंत यासह जिल्हाभरातून सर्व कर्मचारी उपस्थित होते. गुरुवारी बँकेच्या जिल्यातील सर्व १५ शाखांचे कामकाज ठप्प होते. यावेळी इतर बँकेतील कर्मचारी संघटनांनी प्रत्यक्ष येऊन या संपास पाठिंबा व्यक्त केला.