23.9 C
Latur
Sunday, October 6, 2024
Homeमहाराष्ट्रतर वक्तव्य कामकाजातून काढून टाकते

तर वक्तव्य कामकाजातून काढून टाकते

अनिल परबांनी नीलम गो-हेंना चूक लक्षात आणून दिली

मुंबई : राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरु झाल्यापासून विधानपरिषदेत उपसभापती नीलम गो-हे आणि विरोधकांमध्ये सातत्याने कुरबुरी सुरु आहेत. उपसभापती विरोधकांना बोलून देत नाहीत, असा आरोप केला जातो. अशातच सोमवारी विधानपरिषदेत ठाकरे गटाचे नवनिर्वाचित आमदार अनिल परब आणि नीलम गो-हे यांच्यात शा­ब्दिक संघर्ष होताना दिसला. नीलम गो-हे यांनी विधानपरिषद सभागृहात केलेल्या एका वक्तव्याविषयी अनिल परब यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. तसेच हे वक्तव्य कामकाजातून काढून टाकण्याची विनंतीही त्यांनी केली.

अनिल परब यांनी म्हटले की, उपसभापती यांनी आमच्याबाबत आक्षेप नोंदवला आहे. उपसभापती यांनी दोन दिवसांपूर्वी म्हटल होते की, तुम्ही सभागृहात गोंधळ घालता, कारण तुम्हाला उद्धव ठाकरे यांना तुम्ही काय काम करता हे दाखवायचे असते. आता मी तुम्हाला असे म्हणू का, तुम्हाला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना तुम्ही किती काम करताय हे दाखवायचे असत म्हणून आम्हाला बोलू देत नाही. तुम्हाला किती राग येईल ते सांगा, असा सवाल अनिल परब यांनी विचारला. मी उद्धव ठाकरे यांना काय काम करतो हे दाखवले आहे. त्यामुळेच मला चार वेळा त्यांनी आमदार केले आहे.

आता हेच जर मी तुमच्याबाबत बोललो तर तुम्हाला किती राग येईल त्यामुळे तुम्ही तात्काळ माझ्याबाबत जी कमेंट केली आहे, ती सभागृहाच्या कामकाजातून काढून टाका, असे अनिल परब यांनी म्हटले. यावर उपसभापती नीलम गो-हे या सामोपचाराची भूमिका करताना दिसून आल्या. मी तुमच्याविषयी अनावधानाने काही बोलून गेली असेल, तर मी असे काही बोलले आहे का हे तपासून काढून टाकते, असे आश्वासन नीलम गो-हे यांनी अनिल परब यांना दिले. अनिल परब हे नुकतेच मुंबई पदवीधर मतदारसंघातून विधानपरिषदेवर निवडून आले होते. त्यांनी भाजपचे उमेदवार किरण शेलार यांचा पराभव केला होता.

पावसामुळे विधानसभेचे कामकाज स्थगित
मुंबईत आज सकाळपासून जोरदार पाऊस सुरु आहे. त्यामुळे अनेक आमदार आणि अधिकारी अधिवेशनासाठी विधिमंडळात पोहोचू शकलेले नाहीत. त्यामुळे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी उद्या सकाळी ११ वाजेपर्यंत सभागृहाचे कामकाज तहकूब केले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR