सोलापूर-आष्टी उपसा सिंचन योजना टप्पा क्र.२ पोखरापूर उपसा सिंचन योजना पाईप लाईनचे काम पूर्ण होऊनही अनेक महिन्यांपासून तलावात पाणी सोडण्याचा सोडण्याचा मुहूर्त प्रशासनाला मिळत नव्हता. जनहित शेतकरी संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर देशमुख यांनी त्या तलावातच आंदोलन करण्याचा लेखी इशारा दिल्यानंतर चारच दिवसात पोखरापूर तलावात पाणी सोडण्याचे लेखी आश्वासन भीमा उजनी कालवा मंडळाचे अधिक्षक अभियंता धीरज साळे व कार्यकारी अभियंता नारायण जोशी यांनी दिल्याने संघटनेच्या वतीने करण्यात येणारे आंदोलन स्थगित केल्याची माहिती प्रभाकर देशमुख यांनी दिली.
पोखरापूर तलावात पाणी सोडण्याची मागणी तीस वर्षांपूर्वीची आहे. या योजनेमुळे पोखरापूर, खवणी, सारोळे या तीन गावातील शेतकऱ्यांचा सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. १९९८ च्या सार्वत्रिक निवडणुकीत तीन गावच्या शेतकऱ्यांनी मतदानावर १०० टक्के बहिष्कार घालून शासनाचे लक्ष वेधून घेतले होते. पोखरापूर तलावात पाणी सोडण्याची प्रथम मागणी दिवंगत धोंडीबा दादा उन्हाळे यांनी तत्कालीन मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांचेकडे शासन दरबारी केली होती.
तब्बल तीस वर्ष उलटले तरी पोखरापूर तलावात पाणी आले नाही. रखडलेल्या या योजनेमुळे तीन गावातील शेतकऱ्यांचा वनवास सुरूच राहिला. जनहीत शेतकरी संघटनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी अनेक वेळा आंदोलने केली. टप्पा क्र. दोन पोखरापूर उपसा सिंचन योजना अनेक वर्षापासून प्रशासनाच्या दारात रेंगाळत आहे. शेतकऱ्यांनी केलेल्या मागणीची दखल न घेणाऱ्या संबंधित अधिका-यांच्या कार्यालयाला कुलूप ठोकण्याचा इशारा देण्यात आला होता तसेच जनहित शेतकरी संघटनेच्या वतीने पोखरापूर तलावात पाणी येईपर्यंत तलावातच आंदोलन करण्याचा इशारा प्रभाकर देशमुख यांनी दिला होता.
संबंधित अधिका-यांनी याची दखल घेऊन फक्त चारच दिवसात पाणी सोडण्याची कार्यवाही करण्यात येईल असे लेखी आश्वासन भीमा उजनी कालवा मंडळाचे अधिक्षक अभियंता धीरज साळे व कार्यकारी अभियंता मंगळवेढा येथील नारायण जोशी यांनी दिल्याने आनंद व्यक्त करुन आंदोलन स्थगित करण्यात आले आहे. यावेळी पंजाब करंडे, पोखरापूरचे माजी सरपंच किरण वाघमारे, सारोळेचे सरपंच शाहीर सलगर, कामराज अण्णा चव्हाण, सचीन शेळके, गुंडिबा राऊत, लक्ष्मण वाघमारे, रामभाऊ मुळे, अमोल कथले, मुकुंद भोसले आदी पदाधिकारी उपस्थित होते.