उत्तरे देण्यास टाळाटाळ, तहव्वूर राणाचा आडमुठेपणा कायमनवी दिल्ली : वृत्तसंस्था
मुंबई हल्ल्यातील सूत्रधार तहव्वूर राणाला पटियाला न्यायालयाने गुरुवारी रात्री उशिरा १८ दिवसांची एनआयए कोठडी सुनावली. त्यानंतर राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) शुक्रवारी कसून चौकशी सुरू केली. आज त्याची जवळपास ३ तास चौकशी केली. यावेळी तपास अधिका-यांनी त्याच्यासमोर प्रश्नांचा भडिमार केला. परंतु त्याने बहुतेक प्रश्नांची उत्तरे मला माहीत नाही किंवा मला आठवत नाही, अशीच दिली. त्याने अधिका-यांच्या प्रश्नांना उत्तरे देण्यास जाणीवपूर्वक टाळले. चौकशीदरम्यान त्याला त्याचे कुटुंब आणि मित्रांशी संबंधित प्रश्न विचारण्यात आले. परंतु आजारपणाचे कारण देऊन त्याने वारंवार चौकशी टाळण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे चौकशीत त्याचा आडमुठेपणा कायम असल्याचे तपास अधिका-यांचे म्हणणे आहे.
मुंबईवर झालेल्या २६/११ च्या हल्लातील मुख्य आरोपी तहव्वूर राणा याचे अमेरिकेतून गुरुवारी भारतात प्रत्यार्पण केले. गेल्या १५ वर्षांपासून भारताकडून करण्यात येणा-या प्रयत्नांना यश आले. राणाला घेऊन आलेले विमान काल दिल्लीच्या पालम एअरपोर्टवर उतरले. तिथून त्याला थेट एनआयएच्या कार्यालयात नेण्यात आले. तेथून त्याला पतियाळा हाऊस न्यायालयात हजर करण्यात आले. गुरुवारी रात्री उशिरापर्यंत त्यासंबंधी सुनावणी झाली. मध्यरात्रीच्या सुमारास न्यायालयाने राणाला १८ दिवसांची कोठडी सुनावली. त्यानंतर आज एनआयएने त्याची चौकशी सुरू केली.
कोर्टात हजर करताच एनआयएने गुरुवारी दिल्लीतील न्यायालयात राणाबद्दल धक्कादायक खुलासा केला. २६/११ च्या मुंबई हल्ल्यातील आरोपी तहव्वूर राणाने मुंबईप्रमाणे भारतातील इतर शहरात दहशतवादी हल्ला करण्याचा कट रचला होता, असा संशय राष्ट्रीय तपास संस्थेने व्यक्त केला. त्यामुळे तहव्वूर राणाची कसून चौकशी करणे आवश्यक आहे. १७ वर्षांपूर्वी घडलेल्या घटनांची तपासणी करण्यासाठी त्याला विविध ठिकाणी घेऊन जाण्याची गरज आहे. हा कट त्याने कसा रचला, या कटाच्या मुळापर्यंत पोहोचण्यासाठी आणि दहशतवादी नेटवर्कचा पर्दाफाश करण्यासाठी तहव्वूर राणाची चौकशी करणे आवश्यक असल्याचे एनआयएने म्हटले होते. त्यामुळे त्याला आता १८ दिवसांची एनआयए कोठडी मिळाली असून, आता त्याची कसून चौकशी सुरू आहे. परंतु चौकशीदरम्यान प्रश्नांचा भडिमार होत असताना तो उत्तरे देण्यास टाळाटाळ करीत आहे. त्यामुळे त्याचा आडमुठेपणा कायम असल्याचे समोर आले.