वॉशिंग्टन : वृत्तसंस्था
पाकिस्तानमधील दहशतवादी संघटना लष्कर-ए-तोयबाने मुंबईवर २६ नोव्हेंबर २००८ रोजी दहशतवादी हल्ला केला होता. या हल्ल्यातील आरोपी आणि पाकिस्तानमधील व्यावसायिक तहव्वूर हुसैन राणाला भारताच्या ताब्यात देण्याबाबत अमेरिकी न्यायालयाने अनुकूल निकाल दिला आहे. तहव्वूर राणाचे अमेरिकेतून भारतात प्रत्यार्पण करण्यात येईल, असे सांगितले जात आहे. अमेरिकेच्या ‘यूएस कोर्ट ऑफ अपील्स फॉर द नाइन्थ सर्किट’ न्यायालयाने प्रत्यार्पण करारानुसार तहव्वूर राणाला भारताच्या स्वाधीन केले जाऊ शकते, असे सांगितले आहे.
तहव्वूर राणा सध्या लॉस एंजल्स येथे तुरुंगात आहे. मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील प्रमुख आरोपी आणि लष्कर-ए-तोयबाचा दहशतवादी डेविड हेडलीशी संबंध असल्याचा राणावर आरोप आहे. तहव्वूर राणाला भारताच्या स्वाधीन करता येऊ शकते. भारताने त्यासाठी योग्य ते पुरावे दिले आहेत, असे न्यायाधीश मिलान स्मिथ यांनी सांगितले. मुंबईवर केलेला दहशतवादी हल्ला योग्यच होता, अशी कबुलीही राणाने दिल्याचे सुनावणी दरम्यान न्या. स्मिथ यांनी सांगितले.