35 C
Latur
Sunday, March 30, 2025
Homeसंपादकीयतापदायक तापमान

तापदायक तापमान

महाराष्ट्रातील तापमानात वाढ होत असतानाच मध्य महाराष्ट्रात पाऊस तर विदर्भात उष्णतेच्या झळा बसत आहेत. राज्यात येत्या चार-पाच दिवसांत हवामान कोरडे राहण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. राज्यात गेल्या काही दिवसांपासून तापमानात वाढ झाली असून विदर्भ, मराठवाड्यातील तापमानात किंचित वाढ झाली आहे. गत २४ तासांत राज्यात सर्वांत जास्त तापमान ब्रह्मपुरी येथे ३९.३ तर सर्वांत कमी अहिल्यानगर येथे १५.७ अंश सेल्सिअस इतके नोंदले गेले. मराठवाड्यात २४ मार्चपासून २९ मार्च दरम्यान हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. संपूर्ण जगाला हवामान बदलाच्या संकटाला सामोरे जावे लागत आहे. राज्याला फेब्रुवारीपासूनच कडक उन्हाच्या झळा बसत आहेत. जागतिक स्तरावर तापमानात सरासरी १.६५ सेल्सिअस वाढ झाली आहे. त्यामुळे आतापासूनच योग्य पावले न उचलल्यास दुष्काळ, समुद्राच्या पातळीत वाढ आणि प्राणी-पक्ष्यांना धोका निर्माण होईल अशी चिंता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. २३ मार्च हा जागतिक हवामान दिन म्हणून साजरा झाला. या पार्श्वभूमीवर जागतिक तापमानवाढ, हवामान बदल यावर जगभरात मोठ्या प्रमाणावर विचारमंथन सुरू झाले आहे. विविध मानवी उलाढालींमुळे जागतिक तापमानात वाढ होत आहे. वीज प्रकल्प, वाहतूक, इंधन यामुळे जगात १.२ अंश सेल्सिअस तापमान वाढले आहे. १९ व्या शतकापासून आतापर्यंत वातावरणातील कार्बन डाय ऑक्साईड या हरितगृह वायूचे प्रमाण ५० टक्क्यांनी वाढले आहे.

गत २० वर्षांत त्यात १२ टक्क्यांनी वाढ झाली आहे. हवामान बदलाचे अनपेक्षित परिणाम दिसायला सुरुवात झाली आहे. मुसळधार पाऊस, वादळ, सुपिक जमीन ओसाड होणे, उष्णतेची लाट असे बदल दिसू लागले आहेत. या शतकाच्या अखेरपर्यंत पृथ्वीचे तापमान दोन अंशांनी वाढण्याची शक्यता आहे. शास्त्रज्ञांनी हवामान बदलासाठी १.५ अंश सेल्सिअसपर्यंत तापमानवाढीची मर्यादा ठरवली होती. २०२४ मध्ये जगाचे सर्वसाधारण तापमान १.६५ अंश सेल्सिअसपर्यंत नोंदवण्यात आले. ते आता १.५ अंश सेल्सिअसपर्यंत रोखणे गरजेचे आहे. विविध मानवी घडामोडींमुळे जागतिक तापमानात झपाट्याने वाढ होत आहे. वीज प्रकल्प, वाहतूक आणि घरात इंधन, गॅस, कोळसा वापरामुळे तापमानात वाढ होण्यास मदत झाली. इंधनाच्या वापरामुळे हवेत सोडले जाणारे वायू सूर्याची ऊर्जा अडवतात. हरितगृह वायूचे प्रमाण वाढण्याचे मुख्य कारण म्हणजे जंगलतोड. संयुक्त राष्ट्रसंघाने (युनो) यंदाचा आंतरराष्ट्रीय जलदिन ‘हिमनद्यांचे संरक्षण आणि संवर्धन’या संकल्पनेसाठी साजरा करण्याचे आवाहन केले होते. बर्फ, बर्फाच्छादित डोंगर, हिमनग, हिमनद्या आदींचा आपल्याशी काय संबंध असे सर्वसामान्यांना वाटू शकते. परंतु हिमनद्या सांभाळणे केवळ हिमालयासाठी नव्हे तर मानवजात व निसर्गासाठी आवश्यक आहे.

माणसाला जगण्यासाठी हवेनंतर आणि अन्नाआधीही अत्यावश्यक बाब म्हणजे पाणी. पृथ्वीच्या वातावरणात पाण्याचे प्रमाण सुमारे ७० टक्क्यांहून अधिक आहे. माणसाच्या आणि सजीवांच्या शरीरात पाण्याचे प्रमाण सुमारे ६० ते ७० टक्के आहे. वनस्पतींमध्ये पाण्याचे प्रमाण ८० ते ९० टक्के आहे. या सर्वांसाठी पाण्याच्या उपलब्धतेबाबतची स्थिती मात्र भयंकर आहे. उन्हाळा संपण्यासाठी अजून तीन महिन्यांचा अवकाश आहे. मात्र आतापासूनच देशात अनेक ठिकाणी ‘पाण्याची आणीबाणी’ सुरू झाली आहे. कोरड्या ठणठणीत विहिरी, कोरडे तलाव, नद्यांचे वाळवंटीकरण, गाव-शहरातील पाणीपुरवठा विभागात ठणठणाठ अशी स्थिती आहे. या पार्श्वभूमीवर ‘हिमनद्या संवर्धना’चे महत्त्व समजून घेणे आवश्यक आहे. मनुष्य, जनावरे, शेती, उद्योग आणि पर्यटन यासाठी प्रामुख्याने पाणी लागते. सजीव प्राण्यांसाठी बव्हंशी गोडे पाणी लागते पण गोड्या पाण्याची उपलब्धता कमी झाली आहे. कारण आपण मुक्त हस्ते जलप्रदूषण वाढवत आहोत. सांडपाणी, मलविसर्जन आणि अन्य घाण यामुळे नदी-नाले-तलाव दूषित होण्याचे प्रमाण वाढले आहे. हवामान बदल आणि तापमानवाढ यामुळे पाण्याचे अतिरिक्त बाष्पीभवनाचे प्रमाण वाढले असून त्यामुळे गोड्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. मोठमोठे हायवे, उंच इमारती, कारखाने, फ्लाय ओव्हर्स आदी पायाभूत उभारणीसाठी मोठ्या प्रमाणात बांधकाम सुरू असल्याने पाणी कमी पडत आहे.

पाणी जपून वापरा असे आवाहन केले जाते पण त्याचे पालन कोणीच करत नाही. पृथ्वीवर पाण्याचे प्रमाण विपुल असले तरी त्यातील ९०-९५ टक्के पाणी समुद्रातील आहे. हे पाणी मनुष्य, पशू व वनस्पतींसाठी उपयुक्त नाही. हे पाणी खारे आहे. पृथ्वीवर उपलब्ध पाण्यापैकी फक्त अडीच टक्के पाणी हे गोडे आहे. जगातील ७० टक्के गोडे पाणी हिमनगात आहे. त्यामुळे हिमनद्यांचे संवर्धन आवश्यक आहे. गत काही वर्षांत हिमनग वितळण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे गंगा, सिंधू, ब्रह्मपुत्रा या नद्यांना येणा-या पुरामुळे होणारे नुकसान वाढले आहे. केवळ नदीला माता मानून आणि तिचे पूजन करून नद्या आणि पाणी वाचणार नाही. त्यासाठी पाण्याचा काळजीपूर्वक वापर, सांडपाण्यावर प्रक्रिया करून फेरवापर, नद्या, तलाव, नाले आणि समुद्रावर आक्रमण न करणे आदी पथ्ये पाळावी लागतील. सध्या तापणा-या उन्हाने यंदाचा उन्हाळा सामान्य नसल्याची जाणीव करून दिली आहे. मार्च महिन्यात अनेक भागांमध्ये उष्णता वाढू लागल्याने तापमानाने ४० अंशाचा टप्पा ओलांडण्यास सुरुवात केली आहे.

त्यामुळे आगामी तीन महिन्यांत आपली किती होरपळ होईल ते सांगणे कठीण आहे. पाणवठे कोरडे पडणे, जनावरांच्या पाणी आणि चा-याचा प्रश्न, उष्माघातामुळे होणारे मृत्यू, भाजीपाल्याची कमतरता आणि कडाडणा-या किमती असे अनेक प्रश्न उभे राहणार आहेत. अनेक ठिकाणी उष्णतेचा प्रचंड कहर बघावयास मिळणार हे जवळपास निश्चित आहे. अर्थात या तापमानवाढीस आपणच जबाबदार आहोत. मानवी हस्तक्षेप आणि त्याच्या व्यवहाराचे दुष्परिणाम तापमानवाढीस कारणीभूत ठरत आहेत. मानवी हस्तक्षेपामुळे जंगलतोड सुरू आहे. देशात वृक्षतोड अधिक तर वनीकरणाचे प्रमाण गरजेपेक्षा अत्यंत कमी आहे. पाणी संकलनाचे प्रमाण कमी झाल्याने यंदा वातावरण अधिक तापताना दिसत आहे. पाण्याच्या साठवणुकीच्या समस्या वाढत आहेत. हवामानातील बदलामुळे पाऊस कमी झाला आहे. पाऊस झालाच तर अचानक आणि प्रचंड प्रमाणात होतो. या जणू काही धोक्याच्या घंटा आहेत परंतु त्या ऐकू आल्या तरच ना!

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR