भारत आणि अमेरिकेमध्ये सुरू असलेला व्यापार करारासंबंधीचा तिढा अद्याप सुटलेला नाही उलट त्यासंबंधीचा गुंता वरचेवर वाढतच चालला आहे. त्यात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताबरोबर कोणताही व्यापार करणार नसल्याचे सांगून तेल ओतण्याचेच काम केले आहे. जोपर्यंत आयात शुल्काचा मुद्दा सुटत नाही, तोपर्यंत भारतासोबत कोणतीही चर्चा होणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. अमेरिकेने सध्या भारतावर ५० टक्के आयात शुल्क लावले आहे.
भारत रशियाकडून तेल खरेदी करत असल्याने हे शुल्क लागू करण्यात आले. पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ट्रम्प म्हणाले, जोपर्यंत आयात शुल्काचा मुद्दा सुटत नाही, तोपर्यंत व्यापार करारावर चर्चा करणार नाही. ट्रम्प यांनी हा खुलासा करण्याआधी एक दिवस व्हाईट हाऊसने एक कार्यकारी आदेश लागू केला होता. यात रशियासोबत व्यापार केल्यामुळे भारतावर अतिरिक्त २५ टक्के शुल्क लावण्याची घोषणा केली होती. भारताने रशियाकडून तेल खरेदी करून आणि ते मोठ्या नफ्यावर आंतरराष्ट्रीय बाजारात विकून रशियाच्या अर्थव्यवस्थेला मदत करणा-या देशांना रोखणे आणि रशियाला त्याच्या आक्रमकतेसाठी गंभीर परिणाम भोगायला लावणे हा आहे. अमेरिकेने ५० टक्के शुल्क लावल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, भारतातील शेतक-यांच्या हितासाठी आर्थिक परिणाम भोगावे लागले तरीही, भारत कधीही तडजोड करणार नाही.
शेतक-यांचे हित ही आपली सर्वोच्च प्राथमिकता आहे. यासाठी मोठी किंमत मोजावी लागेल हे मला माहीत आहे आणि मी त्यासाठी तयार आहे. भारत त्यासाठी तयार आहे. अमेरिकेशी संबंध ताणले गेल्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियन अध्यक्ष ब्लादिमीर पुतिन यांच्याशी फोनवर संवाद साधला. या चर्चेत दोन्ही देशांमधील धोरणात्मक भागीदारी अधिक दृढ करण्याचा निर्धार मोदी यांनी व्यक्त केला. या चर्चेबाबत मोदींनी सोशल मीडियावर माहिती दिली. मोदी म्हणाले की, माझे मित्र पुतिन यांच्याशी अत्यंत चांगली आणि सविस्तर चर्चा झाली. या वर्षाच्या अखेरीस होणा-या २३व्या भारत-रशिया वार्षिक शिखर परिषदेसाठी पुतिन यांचे स्वागत करण्यास आपण उत्सुक आहोत. युक्रेनविरुद्धच्या संघर्षाबाबत भारताची भूमिका स्पष्ट करताना मोदी म्हणाले, भारत या संघर्षाचे शांततापूर्ण निराकरण करण्याच्या बाजूने आहे. भारताने रशिया आणि युक्रेनला चर्चेतून हा संघर्ष संपवण्याचे आवाहन केले आहे.
दोन्ही नेत्यांनी द्विपक्षीय अजेंड्याच्या प्रगतीचा आढावा घेतला आणि भारत-रशिया यांनी धोरणात्मक भागीदारी अधिक वाढवण्याचा संकल्प केला. ट्रम्प यांनी भारतीय वस्तूंच्या आयातीवरील टॅरिफ २५ टक्क्यांवरून ५० टक्क्यांपर्यंत वाढवले आहे. पहिल्या टप्प्यात ७ ऑगस्टपासून २५ टक्के टॅरिफ लागू करण्यात आले, तर दुस-या टप्प्यात २७ ऑगस्टपासून अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ लागू केले जाणार आहे. अमेरिकेचा हा निर्णय एकतर्फी असल्याचे भारताने म्हटले आहे. रशियाशी व्यापार संबंध असणा-या देशांवर दुहेरी निर्बंध लादण्याचा इशारा ट्रम्प यांनी याआधी दिला होता. इतर देशही रशियाकडून तेल खरेदी करत असताना केवळ भारतालाच का लक्ष्य केले जात आहे, असा प्रश्न त्यांना करण्यात आल्यानंतर भारताबाबत त्यांनी नवीन वक्तव्य केले आहे. ट्रम्प यांनी स्पष्ट केले आहे की, भारतासोबतची द्विपक्षीय व्यापार चर्चा थांबविण्यात आली आहे.
५० टक्के टॅरिफ लागू करण्याच्या घोषणेनंतर भारतासोबत द्विपक्षीय वाटाघाटी वाढतील का असा प्रश्न पत्रकारांनी केला असता ट्रम्प म्हणाले, जोपर्यंत आम्ही तोडगा काढत नाही तोपर्यंत नाही. भारत-पाक युद्ध झाले तेव्हा अमेरिका थेट सहभागी झाली आणि राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी दोन अण्वस्त्रधारी शेजा-यांमध्ये शांतता प्रस्थापित केली, असा दावा अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रुबिया यांनी केला. ते म्हणाले, ट्रम्प हे शांततेसाठी कटिबद्ध आहेत म्हणूनच आम्ही भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्ध झाले तेव्हा थेट सहभागी होऊन हे युद्ध थांबवले. त्यामुळे भारतीय उपखंडात शांतता प्रस्थापित झाली. अमेरिकेने भारतावर ५० टक्के टॅरिफ लावल्यानंतर भारताने आता त्याबाबत ताठर भूमिका घेतली आहे. अमेरिकेकडून भारताने शस्त्र खरेदी बंद केल्याचे वृत्त ‘रॉयटर्स’ने दिल्याने मोठी खळबळ उडाली आहे. भारताचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह हे पुढील आठवड्यात संरक्षण करारासाठी अमेरिकेला जाणार होते. मात्र, त्यांनी हा दौराही रद्द केला आहे. ‘रॉयटर्स’ने तीन भारतीय अधिका-यांचा हवाला देत हे वृत्त दिले आहे.
मात्र, भारत सरकारने हे वृत्त फेटाळले असून ते चुकीचे व खोटे असल्याचे म्हटले आहे. अमेरिकेकडून शस्त्रास्त्र खरेदी पहिल्यासारखीच सुरू असल्याचेही म्हटले आहे. ट्रम्प यांच्या ‘टॅरिफ बॉम्ब’नंतर अमेरिकेतील कंपन्या भारतीय वस्तूंच्या आयातीबाबत काय निर्णय घेणार याची भारतीय निर्यातदारांना चिंता वाटत होती. आपल्या ऑर्डर्सवर परिणाम होईल असे त्यांना वाटत होते. नेमके तेच झाले आहे. वॉलमार्ट, अॅमेझॉन, टार्गेट, गॅप या कंपन्यांनी भारतातील त्यांच्या ऑर्डर्स रोखल्या आहेत. या निर्णयाचा भारतीय कापड उद्योगावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे. यामुळे एकूण खर्चात ३० ते ३५ टक्के वाढ होईल. तसेच अमेरिकेतून येणा-या ऑर्डर्समध्ये ४० ते ५० टक्के घट होईल. तज्ज्ञांच्या मते यामुळे ३५ ते ४३ हजार कोटी रुपयांचे नुकसान होऊ शकते. अमेरिकेत विकल्या जाणा-या भारतीय वस्तूंच्या किमती ३० ते ३५ टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे.