तिरुपती : वृत्तसंस्था
आंध्र प्रदेशातल्या तिरुपती देवस्थानच्या लाडू प्रसादावरुन सध्या घमासान सुरु आहे. या लाडूमध्ये जनावरांची चरबी आणि माशांच्या तेलाचा वापर होत असल्याचे लॅबच्या रिपोर्टवरुन स्पष्ट झाले आहे. त्यानंतर आता तिरुपती देवस्थानने ‘एआर डेअरी’विरोधात पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
‘टीटीडी’ अर्थात तिरुमला तिरुपती देवस्थानने जनरल मॅनेजर पी. मुरली कृष्णा यांनी ईस्ट पोलिस ठाण्यात एआय डेअरी फूड प्रायव्हेट लिमिटेड, डिंडीगुल या संस्थेविरोधात विरोधात तक्रार दाखल केली आहे. यापूर्वी सरकारने पोलिस अधिकारी सर्वश्रेष्ठ त्रिपाठींच्या नेतृत्वामध्ये एसआयटी गठीत केली आहे.
एफएसएसएआयने एआर डेअरी फूड प्रायव्हेट लिमिटेडला नोटीस पाठवून खाद्य सुरक्षा मानक अधिनियम २०११च्या निकषांचे उल्लंघन केल्याचे म्हटले आहे. त्यामुळे त्यांचा परवाना का रद्द केला जाऊ नये? अशी नोटीस पाठवली आहे. केंद्रीय प्रयोगशाळेत तुपाच्या तपासणीनंतर तफावत आढळून आल्याचे ‘एफएसएसएआय’ म्हटले आहे.
टीटीडीच्या तूप खरेदी समितीने पुरवठा झालेले सर्व सॅम्पल्स गुजरातच्या आनंद येथील ‘एनडीडीबी काल्फ लॅब’मध्ये पाठवले होते. तुपाच्या मानकांमध्ये तफावत असल्याचे ‘एफएसएसएआय’च्या निदर्शनास आलेले आहे.
दरम्यान, तिरुपती मंदिरामध्ये पुजा-यांनी रविवारी शुद्धीकरणासाठी पूजापाठ केला होता. मंदिर प्रशासनाने याबाबत माहिती देताना लाडू प्रसादाला पावित्र्य बहाल केल्याचे म्हटले होते. या प्रकरणी केंद्र सरकार काय भूमिका घेणार, हे पाहाणे महत्त्वाचे आहे.