जळकोट : प्रतिनिधी
नांदेड जळकोट उदगीर या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५० वर तिरुका गावाजवळ राष्ट्रीय महामार्गाचे काम अपूर्ण आहे . आता मात्र या गावाजवळ राष्ट्रीय महामार्ग अतिशय धोकादायक बनला आहे . या महामार्गाची एवढी वाईट अव्यवस्था झाली आहे की पावसाळ्यामध्ये हा मार्ग बंद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे . हा मार्ग जर बंद झाला तर याला सर्वस्वी जबाबदार नांदेड येथील राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी असणार आहेत .
नांदेड – जळकोट – उदगीर या राष्ट्रीय महामार्गाचे काम पाच वर्षांपूर्वी पूर्ण झाले. पाच वर्षानंतरही राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिका-यांना तिरुका गावाजवळचे रस्त्याचे काम पूर्ण करता आले नाही. हे दुर्दैव म्हणावे लागेल. सध्या असलेल्या जुन्या पुलावर जर उन्हाळ्यामध्येच अधिका-यांनी डांबरीकरण केले असते तर काही अंशी हा महामार्ग चालू राहिला असता परंतु जुन्या रस्त्याचेही काम बांधकाम विभागाच्या अधिका-यांना करता आली नाही. जळकोट तालुक्यातील तिरुका गावाजवळ तिरू नदीवर मोठा जुना पूल आहे , या पुलावर गुडघ्या एवढे मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. या खड्ड्यामध्ये पाऊस पडल्यानंतर मोठ्या प्रमाणात पाणी साचून राहत आहे . यामुळे वाहन चालकांना रस्ता कुठे आहे हेच दिसेनासे झाले आहे आणि विशेष म्हणजे पुलावर अनेक दिवस पाणी साचून राहत असल्यामुळे पूलही कमजोर होऊ लागलेला आहे.
अगोदरच २०१६ साली तसेच २०१९ मध्ये तिरु नदीला महापूर आला होता यामध्ये पुलावरून पाच ते दहा फूट पाणी गेले होते यामुळे अगोदरच हा पूल कमजोर झाला आहे आणि अशा मध्ये पूर्ण पुलावर पाणी साचून राहत आहे . हा पुल कधी कोसळेल याचा नियम नाही. येथील रस्ता अतिशय खराब झाल्यामुळे अनेक अवजड वाहतूकही या रस्त्यावरून बंद झाली आहे. छोटे मोठे वाहनही आता जीव मुठीत धरून चालवावे लागत आहेत. अनेक वेळा निवेदन देण्यात आले. रास्ता रोको करण्यात आला तरीही राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिका-यांना याबाबत कारवाई करावी वाटली नाही हे दुर्दैव म्हणावे लागेल . तसेच जुन्या पुलाच्या बाजूला नवीन पूल उभा केला या पुलाचे कामदेखील पूर्ण झाले परंतु पुलाच्या मागचे काम तसेच पुढचे काम अपूर्ण आहे. पुलाच्या समोर मोठा दादरा उभा केला आहे परंतु दाद-यावरीलही काम अपूर्ण आहे. या दाद-यावर मोठा उतार आहे मोठा पाऊस झाल्यामुळे वरचा मुरूम पूर्णपणे वाहून गेला आहे आणि फक्त मोठमोठे दगड उघडे पडले आहेत. या दगडावरूनच वाहने नेण्याची वेळ वाहन चालकावर आलेली आहे.
या दाद-यावर मुरूम टाकण्याची तसेच कच टाकण्याचीही तसदी महामार्ग विभागाच्या अधिका-यांनी घेतली नाही . तसेच दादर यावर एका वेळी दोन वाहनेहीे मावणे अवघड होऊन बसले आहे , जर कामच पूर्ण करायचे नव्हते तर हा दादरा केला कशाला असा सवालही आता उपस्थित केला जात आहे. आता सलग झालेल्या पंधरा दिवसाच्या पावसामुळे तिरुका गावाजवळील पुलावर तसेच दाद-यावर मोठी दुरवस्था झालेली आहे. कधी मोठा अपघात होईल आणि किती जीव जातील याचा नेम सांगता येणार नाही तसेच या पुलावरील कठडे पूर्णपणे गायब झालेले आहे अंधारात नवीन वाहनचालकांना या ठिकाणाहून रस्ता देखील कळणार नाही.